Ashok Pawar News, Pune Latest Marathi News, Shikrapur News
Ashok Pawar News, Pune Latest Marathi News, Shikrapur News Sarkarnama
पुणे

आमदार अशोक पवार शिरूर-हवेलीला लवकरच देणार ‘गूड न्यूज’!

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : आमदार अशोक पवार (Ashok Pawar) हे लवकरच शिरूर-हवेलीला ‘गूड न्यूज’ देण्याच्या तयारीत आहेत. या मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायत आणि नगर परिषदेत रुपांतरीत करण्याची हालचाली आमदार पवार यांनी सुरू केली आहे. शिरुरमधील शिक्रापूर आणि सणसवाडी या दोन गावांची, तर हवेलीतील उरुळी-कांचन, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर तीन गावांची निवड केली आहे. उरुळी-कांचनला नगरपालिका आणि उर्वरीत चार गावांत नगरपंचायत व्हावी, यासाठी आमदारांनी पावले टाकली आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनी ही माहिती दिली. (Ashok Pawar's demand for Nagarpalika, Nagar Panchayat for five villages in Shirur-Haveli)

शिरुर-हवेलीतील चार ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये तर, एका ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे नुकतीच केली आहे. या पाचही गावांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा आमदार अशोक पवार करणार असून लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने या पाचही गावांची विकासगती वाढण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव दिल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. (Pune Latest Marathi News)

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या घनता दर वाढणारा तालुका म्हणून हवेली सर्वश्रुत आहे. त्याखालोखाल असलेला शिरुर तालुक्यातील पुण्याजवळील गावांची लोकसंख्या व लोकवस्ती वाढीचा दर मोठा असल्याने या गावांमध्ये ग्रामपंचायतींना गावविकास संभाळणे आणि गावविस्तारावर पूर्ण क्षमतेने काम करणे अवघड होत असल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमिवर शिरुर-हवेली या दोन्ही तालुक्यातील व याच विधानसभा मतदार संघातील शिक्रापूर, सणसवाडी (ता.शिरुर) व उरुळी-कांचन, कदमवाकवस्ती तसेच लोणी-काळभोर (ता.हवेली) या पाच गावांतील नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचा दर्जा नगरपंचायत व नगर परिषदेत वर्ग करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पाऊल उचलले आहे.

उरुळी-कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या ३० हजार ३०५ च्याही पलिकडे गेल्याने या गावासाठी नगरपरिषद व्हावी म्हणून तर शिक्रापूर (लोकसंख्या २० हजार २६३), सणसवाडी (लोकसंख्या १३ हजार ५४३) तर हवेलीतील कदमवाकवस्ती (लोकसंख्या १९ हजार ३२९) व लोणी-काळभोर (लोकसंख्या २२ हजार ३१८) या चार गावांसाठी नगरपरिषद व्हावी, अशा मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार पवार स्वत: करणार आहेत. त्यामुळे शिरुर-हवेलीत लवकरच नगर परिषद व नगरपंचायतींची घोषणा होईल, असा आशावाद दरेकर यांनी व्यक्त केला.

शिक्रापूर ग्रामसभेत यापूर्वीच ठराव मंजूर

शिक्रापूर नगरपंचायत करण्याचा ठराव ग्रामसभेत यापूर्वीच मंजूर झाला आहे. नागरिकांचा पाठिंबाही या मागणीला आहे. गावचा विकासदर वाढवायचा असेल, तर असे प्रस्ताव तत्काळ मंजूर होणे पाचही गावांसाठी गरजेचे आहे, असे शिक्रापूरचे उपसरपंच मयूर करंजे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT