PCMC Election Latest News
PCMC Election Latest News Sarkarnama
पुणे

इच्छुकांनो लागा तयारीला, अंतिम प्रभाग रचना झाली जाहीर

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक (Local Body Election 2022) कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग (Election Commission) लगेच कामाला लागला. १७ मे पर्यंत ते अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार होते. पण, त्याअगोदरच पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) ही प्रभाग रचना (ता.१३ मे) जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांचा तयारीला लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिकेने पाठवलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यात ४६ पैकी फक्त आठ प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल आयोगाने केला आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) सोईची ठरणार असल्याची शक्यता कायम राहिली आहे. (PCMC Election Marathi Latest News)

दरम्यान, आयोगाने या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर १७ तारखेला सुनावणी आहे. तेव्हाच ही निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. २०१७ ला चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. यावेळी तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने प्रभागांची संख्या ४६ वर गेली आहे. त्यातील शेवटचा ४६ नंबरचा प्रभाग हा चार सदस्यीय आहे. त्यामुळे ओघाने तोच सर्वात मोठा म्हणजे मतदारसंख्या सर्वाधिक (४६,९७९) असलेला प्रभाग आहे.

१ फेब्रुवारीला नव्याने तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल आहे, अशी चर्चा झाल्याने त्यावर भाजपकडून हरकतींचा पाऊस पडला होता. पाच हजार ६८४ हरकती घेण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेऊन ती अंतिम करण्यासाठी २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. दरम्यान, प्रभाग रचनेचे अधिकार स्वताकडे घेण्याचा कायदा राज्य सरकारने केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने पुढची निवडणूक प्रक्रिया म्हणजे प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम खोळंबले होते.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश देऊन निवडणूक जाहीर करण्यास सांगितल्याने राज्याचे मुख्य निवडणूक आय़ुक्त यु.पी.एस. मदान यांनी पिंपरी पालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर केली. त्यामुळे निवडणुकीचे निम्मे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छूक कामाला लागणार आहेत. आठवड्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने कोण, कोठून उभे राहणार हे सुद्धा जवळपास नक्की होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT