Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडचा प्रस्तावित कचरा डेपो हा पुनावळे येथे करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरु केल्यानंतर त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. स्थानिक भाजप आमदार अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची (शरद पवार)ची साथ त्याला मिळाल्याने तो जास्त तीव्र झाला. तर, जगतापांनी हा प्रश्न थेट विधानसभेत लक्षवेधीद्वारे सोमवारी मांडल्याने हा कचरा डेपो रद्द करण्याची घोषणा सरकारला करावी लागली.
उद्योगनगरीचा कचरा डेपो मोशी येथे शंभर एकर जागेत आहे. मात्र, तो फुल्ल झाल्याने पुनावळेत ६५ एकर जागेत तो करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने नव्याने सुरु केल्या होत्या. त्याला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. ही बाब लक्षात घेऊन अश्विनी जगताप(Ashwini Jagtap) यांनी सुद्धा मग स्थानिकांची बाजू लावून धरली.
एवढच नाहीतर सध्या नागपुर येथे सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेत पुनावळ्यात कचरा डेपो करण्यास कडाडून विरोध दर्शवला आणि तेथे ऑक्सिजन पार्क करण्याची मागणी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच त्यांनी याप्रश्नी लक्षवेधीही दिली होती. जी सोमवारी पटलावर आली. त्यावरचे उत्तर समाधानकारक न वाटल्याने त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलेले उद्योगमंत्री उदय सामंतांना(Uday Samant) हा प्रचंड विरोध लक्षात घेता पुनावळ्यात कचरा डेपो होणे अशक्य असल्याचे सांगावे लागले. तसेच त्यासाठी पर्यायी जागा देऊ अशी घोषणा त्यांना करावी लागली.
दरम्यान,यावर बोलताना आपल्या सर्वांसाठी हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे.कारण सर्वांनाच या कचरा डेपोचा त्रास होणार होता,अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी नागपूरहून सरकारनामाला दिली. शिवाय यामुळे शेकडो झाडेही वाचली, असे त्या म्हणाल्या. त्याबद्दल त्यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामंत यांचे आभार मानले.
याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही(शरद पवार गट) पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी महापालिकेसमोर पाच दिवस धरणे आंदोलन नुकतेच केले होते. त्याची दखल घेतल्याबद्दल या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी समाधान व्यक्त केले.यासारखीच दखल शेकडो कोटी रुपयांच्या शहरातील टीडीआर घोटाळ्याचीही सरकारनेही घ्यावी,अशी अपेक्षा त्यांनी व्य़क्त केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.