Devendra Fadnavis statement on Pune bomb case Sarkarnama
पुणे

Hadapsar Bomb Case : हडपसरमध्ये रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अटक, एटीएसने मुसक्या आवळल्या

ATS Pune Bomb Case : सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्ब स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे जंक्शन येथून अटक केली. आरोपीची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामागील हेतू, त्याचे साथीदार आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृह टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हडपसर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशामक दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या नळकांड्यांसारखे स्फोटक साहित्य आणि त्याला जोडलेला डिजिटल टायमर आढळून आला. त्यानंतर ही सामग्री सुरक्षितपणे जप्त करून ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर नेण्यात आली. तेथे नियंत्रित पद्धतीने स्फोटक निकामी करण्यात आले होते.

उषाकिरण रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्यांनी तातडीने माहिती दिली होती. प्रत्यक्ष पाहणी केली असता चार नळकांड्या बांधून त्यावर डिजिटल घड्याळासारखे उपकरण लावलेले दिसले. त्यानंतर ती वस्तू खबरदारी म्हणून बाहेर काढून पोलिसांना कळविण्यात आले होते.

सापळा रचून केले जेरबंद

घटनेची गंभीर दखल घेत तपास दहशतवाद विरोधी पथकासह गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी पुण्याहून फरार झाल्यानंतर नागपूरकडे गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार नागपूर रेल्वे जंक्शन परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

एटीएसकडून तपास सुरू

या कटात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. आरोपीचे इतर राज्यांतील किंवा संशयित संघटनांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास एटीएसकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम ४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इलेक्ट्रिक स्कूटर चालक पोलिसांसमोर हजर झाला होता. त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू ठेवला होता. अखेर एटीएसने आरोपीला नागपूरमधून अटक करत प्रकरणाचा छडा लावला. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT