Ashwini Jagtap Mla Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad : 36 प्राण्यांचे मृत्यू भोवले; भाजप आमदाराचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Bahinabai Chaudhary Prani Sangrahalaya Pimpri Chinchwad Municipal Corporation Animal Deaths : प्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे धाबे दणाणले आहे...

उत्तम कुटे: सरकारनामा

Maharashtra Assembly Winter Session 2023 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील 36 प्राणी गेल्या सहा वर्षांत मृत्यू पावले आहेत. या प्रकरणी चौकशीची मागणी अनेक प्राणीप्रेमी व्यक्ती आणि संस्थांनी केली. पण हे नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगत पालिकेने ती चौकशी टाळली होती. विधानसभेत हा प्रश्न आज उपस्थित झाल्यानंतर आता या प्रकरणी चौकशी होणार आहे. हे प्राणी मृत्यू प्रकरण पालिकेला भोवले आहे. आता हे संग्रहालय पालिकेकडून वन विकास महामंडळाकडे दिले जाणार आहे.

चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा आज उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. तसेच हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे सोपिवण्याचा आदेश त्यांनी महापालिकेला दिला.

नुतनीकरणाच्या नावाखाली गेले सहा वर्षे हे संग्रहालय बंदच आहे. दुसरीकडे या कालावधीत 34 कोटी रुपये खर्च आणि तेथील 36 विविध प्राण्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यात पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणामुळे एकाचवेळी दहा विषारी आणि बिनविषारी सापांचा मृत्यू झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2017 ते सन 2023 या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या सर्वच प्राण्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा पालिकेचा दावा आहे. परंतू, 36 प्राण्यांचा हा मृत्यू ही गंभीर बाब आहे. त्याची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे ही चौकशी पालिकेवर त्यातही पशुवैद्यकीय विभागावर शेकण्याची शक्यता आहे. प्राणी मृत्युमुखी पडलेल्या कालावधीत भाजपची पालिकेत सत्ता होती. तर, तेथील या मृत्युप्रकरणी विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगसेविका व माजी महापौर मंगला कदम यांनी आवाज उठवला होता. दरम्यान, यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी भाग घेतला. पिंपरी-चिंचवडसह मावळातील चार आमदारांपैकी गेल्या पाच दिवसांत विधानसभेत लागलेला हा पहिलाच प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT