balasaheb thackeray birth anniversary sarkarnama
पुणे

शिवसेनाप्रमुख आणि पुलंची 'ती' भेट..!

पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही.

सरकारनामा ब्युरो

पुणे : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख (shivsena) बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray birth anniversary) यांची आज जयंती. या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना दिलेला उजाळा..

पुलंना महाराष्ट्र शासनाच्यावतीनं 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावर पुलंनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शासनावर टीका केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तर प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. पुलं भाषणात म्हणाले होते,

"वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू?

balasaheb thackeray birth anniversary

'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते! अलीकडं राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचं वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळानं दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात!

साहजिकच पुलंच्या या वक्तव्याला मोठी प्रसिद्धी लाभली होती. शिवसेनाप्रमुख पुलंच्या मतप्रदर्शनानं व्यथित झाले होते. शिवसेनाप्रमुखांनी बोलण्याच्या ओघात पुलंच्या वक्तव्यावर आपल्या शैलीत एक वक्तव्य केलं होतं. त्यावर वादंग झाला होता. पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही. मग दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पुलंवर आगपाखड केली.

"झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?"

असं बाळासाहेब म्हणाले आणि त्यांनी पुलंची 'मोडका पूल' अशी संभावनाही केली होती.

प्रसिद्धीमाध्यमांनी यावर उलटसुलट बातम्या दिल्या होत्या. त्यामुळं बाळासाहेब आणि पुलं यांच्यात दुरावा निर्माण झालाय असं लोकांना वाटत होतं. या घटनेच्या काही दिवसानंतर नाट्यनिर्माते मोहन वाघ आणि राज ठाकरे यांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे पुलंना म्हणाले,

"काकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना आपल्याकडं घेऊन येऊ का?"

त्यावर पुलं उत्तरादाखल म्हणाले,

"अरे कोण बाळ ना....! तो माझ्याकडं कधीही येऊ शकतो. अरे, तो माझा विद्यार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल, मुंबईचा...!

काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलंच्या घरी साडेचार वाजता येणार होते. ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा, कार्यकर्त्यांचा लवाजमा असं काही त्यांच्यासोबत असणार नाही. याची दक्षता घ्यायला पुलंनी सांगितलं. बाळासाहेब आणि पुलंच्या त्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. वृत्तांकनासाठी माझ्यासोबत छायाचित्रकार म्हणून मनोज बिडकरही हजर राहणार होता.

.....आणि तो दिवस उजाडला, भांडारकर रोडवरच्या 'मालती माधव' या पुलंच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. सोबत फक्त रवि म्हात्रे होता. या भेटीची कुणालाच कल्पना दिली नव्हती त्यामुळं कोणीही सोबत नव्हतं. पोलिसांचा तुरळक बंदोबस्त रस्त्यावर होता. पुलं वयोमानानुसार व्हीलचेअरवर होते. राज ठाकरे पुढे झाले, त्यांनी बाळासाहेब आल्याचं पुलंना सांगितलं. सुनीताबाई सामोरं गेल्या. बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला. सुनीताबाईंनी

"या, बाळासाहेब...!"

या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहऱ्यावर नम्र भाव असलेले बाळासाहेब उत्तरले,

" मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता या घरात मी बाळंच आहे....!"

पुलं व्हीलचेअरवर जखडून बसले होते. अंग कंपवातामुळं थरथरत होतं. बाळासाहेब त्यांच्यासमोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि डोकं झुकवून पुलंच्या पायांवर ठेवलं. पुलं गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले,

"बाळ, मला तुझा अभिमान वाटतो...!"

बाळासाहेबांनी झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुलंनी दिलखुलासपणे हसत जणू काही घडलंच नव्हतं, असं व्यक्त झाले. त्या क्षणाचं शब्दचित्र मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून तर छायाचित्र बिडकर यानं टिपलं होतं.

त्यानंतर तासभर पुलं, सुनीताबाई, बाळासाहेब, राज ठाकरे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. ती खासगी भेट असल्यानं मी, म्हात्रे आणि मनोज तिथं उपस्थित राहणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही तिथून बाहेर येऊन खाली येऊन थांबलो. मालती माधव मधून बाहेर पडताना बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. याची बातमी वा फोटो प्रसिद्ध करायचं नाही, असं बजावलं. बाळासाहेबांचं पुलंच्या घरी येणं हे बाळासाहेबांच्या मोठ्यापणाची, मनाची प्रचिती देऊन गेलं. महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात बाळासाहेब आणि पुलं यांच्यात निर्माण झालेला वाद हे पेल्यातलं वादळ ठरलं होतं...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT