Shirur Lok Sabha Constituency Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Constituency : शिरुर मतदारसंघातील 'या' उमेदवाराचं नाराज मतदारांनी हटके बॅनर लावून केलं स्वागत!

Loksabha Election 2024 : जाणून घ्या, काय आहे नेमकं त्या बॅनरवर आणि कोणासाठी लावलं आहे ते बॅनर? `

उत्तम कुटे 

Pune District Politics : पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात आघाडी विरुद्ध महायुती अशी तूर्तास थेट होणारी लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या प्रतिष्ठेची केल्याने ती राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वीच दोन्ही बाजूंच्या प्रचारात रंग भरला आहे. त्यात खेड तालुक्यातील गावात लागलेल्या बॅनर्सची मोठी चर्चा आहे.

`शिरुर`मध्ये महायुतीकडून (अजित पवार राष्ट्रवादी) शिवाजीराव आढळराव-पाटील, तर आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) डॉ. अमोल कोल्हे उमेदवार आहेत. आढळराव हे तीन टर्मचे माजी, तर अभिनेत्याचे नेते झालेले कोल्हे विद्यमान खासदार आहेत. निवडून आल्यानंतर मालिकेच्या शुटींगमुळे खासदार कोल्हे मतदारसंघात साडेचार वर्षात फारसे फिरकलेच नव्हते. हाच कळीचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरत आहे आणि आढळराव आपल्या प्रचारात त्यावरच भर देताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उमेदवारी मिळाल्यानंतर कोल्हे हे मतदारसंघात आता फिरु लागले असून गावभेट दौरे करू लागले आहेत. मात्र, ते गेल्या साडेचार वर्षांत फिरकलेच नसल्याची खंत अनेक गावांत असून ती काही ठिकाणी थेट व्य़क्त सुद्धा झाली आहे. कोल्हेंच्या वक्तृत्वाचा काहीच फायदा आपल्याला झाला नसून त्यांनी आपल्या कामाचा हिशोब देण्याची मागणी वाघोलीतील वॅको या एनजीओने करीत कोल्हेंची अगोदरच अडचण केली आहे. त्यात खेड तालुक्यातील रासे-भोसे गावात लागलेल्या बॅनरने आणखी भर टाकली.

'अमोलदादा,तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत!' असा मतदारसंघात न फिरलेल्या कोल्हेंना टोला लगावणारा मजकूर या गावातील बॅनरवर आहे. त्याखाली आपलाच 2019चा विश्वासू मतदार असा उपरोधिक उल्लेख सुद्धा आहे.

दरम्यान,कोल्हेंना अडचणीत आणणाऱ्या वरील मुद्यावरूनच आढळरावांनी सोमवारी (ता.१५) त्यांना पुन्हा लक्ष्य केले. मी खासदार नव्हतो परंतु सतत जनतेत राहिलो.याउलट जे खासदार होते ते मात्र, सतत शूटिंगमध्येच व्यस्त राहिले.कधीही मतदारसंघातील गावांना भेट दिली नाही,कुठे फिरकले नाही.आता पुन्हा तेच मतं मागायला आले आहेत, असा टोला आढळरावांनी शिरूर तालुक्याच्या तर्डोबाचीवाडी येथील गावभेट दौऱ्यात कोल्हेंना लगावला. कोल्हे कधीच कोणाच्या सुख दुःखात सामील झाले नाही,असे म्हणत मतदारसंघातील लोकांचे प्रश्न तरी त्यांना माहिती आहेत का? असा बोचरा सवालही आढळरावांनी यावेळी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT