NCP Sharad Pawar MLA Bapusaheb Pathare with BJP corporator family members amid district council election buzz. Sarkarnama
पुणे

Pune ZP : पुण्यात सत्तेचा 'पठारे पॅटर्न' : एकाच घरावर लागले 3 पक्षांचे झेंडे; कुटुंबात आमदार, नगरसेवकनंतर आता ZP मेंबरही होणार?

Pune ZP : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या घरात भाजप, राष्ट्रवादी असे तीन पक्ष सक्रिय असून, जिल्हा परिषद निवडणुकीत कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षांतून लढत आहेत.

Hrishikesh Nalagune

Pune ZP : कधीकाळी एकाच घरावर विविध पक्षांचे झेंडे ठेवणाऱ्या कोल्हापूरमधील महाडिक कुटुंबाची बरीच चर्चा होती. 2014 च्या दरम्यान, महादेवराव महाडिक काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. त्याचवर्षी धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून खासदार झाले, तर सहा महिन्यात त्यांचेच पुत्र अमल महाडिक भाजपचे आमदार होते. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत महाडिक गटाची मिळून ताराराणी आघाडी होती.

काहीसा असाच कित्ता पुण्यातील वडगावशेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे गिरवत आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे आणि त्यांचे कुटुंब भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले. बापूसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सुनील टिंगरे यांना पराभूत करून आमदार झाले. वर्षभरातच त्यांच्या मुलाने पुन्हा भाजपची वाट धरली. मुलगा सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि पठारे समर्थक आणखी काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीत खराडी-वाघोली प्रभागातून स्वतः सुरेंद्र आणि विमाननगर वाघोली प्रभागातून सून ऐश्वर्या यांना उभे राहिले. विशेष म्हणजे दोघेही दणदणीत बहुमताने निवडून आले. आता बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुलीही जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पठारे यांची एक मुलगी पूनम अमोल झेंडे पुरंदरमधील 'दिवे गराडे' या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

पूनम झेंडे या IPS अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत. ते पुण्यातच PMRDA क्षेत्राचे पोलिस अधीक्षक आहेत. दुसरी मुलगी दिपाली गव्हाणे सध्या डिंग्रजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांचे पती राहुल गव्हाणे उद्योजक आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी झेंडे आणि गव्हाणे विजयी झाल्यास पठारे यांच्या घरात आमदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद अशा तिन्ही संस्थांमधील सारी सूत्र एकवटणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT