रविकिरण सासवडे
Baramati Assembly Constituency : लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेची चर्चा सुरू झाली अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उमेदवारीवरूनही चर्चांना उधाण आले. अजितदादांच्या काही विधानांमुळे ते निवडणूक लढणार की नाही, लढलीच तर कोणत्या मतदारसंघातून उतरणार... यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. पण अखेर त्यावर पडदा पडला असून दादांच्या प्रचारालाही सुरूवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामती मधून विधानसभेसाठी प्रचार सुरू झाला आहे. मतदारसंघात प्रचाराची वाहने आता फिरू लागली आहेत. या वाहनांवर अजित पवार यांचा फोटो व घड्याळ चिन्ह दिसत असून दादांना विजयी करण्याचे आवाहन करणारा मजकूर त्यावर आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. प्रचारादरम्यान अजितदादांनी एका सभेत मला जर मिठाचा खडा लागला तर मी इथून विधानसभा लढवणार नाही असे विधान केले होते. त्यानंतरही तालुक्यातून सुप्रिया सुळेंना 48 हजारांचे मताधिक्य मिळाले.
सुनेत्रा पवार यांची निवडणुकीतील पीछेहाट अजित पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि ते खरेच विधानसभा लढवणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. बारामतीमधील त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था तयार झाली. त्यातच अजित पवार यांनी बारामती मधील कार्यक्रमांमधून आपण बारामती मध्ये जो उमेदवार देऊ त्याच्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल असे वक्तव्य करून त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकच संभ्रम वाढवला होता.
बारामती तालुक्यामध्ये शरद पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरूवातीपासूनच आहे. त्यांच्याविरोधात अजित पवारांचे पुत्र जय पवार असतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. पण अजित पवार यांचे समर्थक स्वतः अजितदादांनीच विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होते.
त्यानंतरही अजित पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली नव्हती. बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत आत्ताच उमेदवारी जाहीर करा अशी भूमिका घेत अजित पवार यांना गळ घातली. मात्र चाणक्ष अजितदादांनी तुमच्या मनातला उमेदवार असेल असे सांगत स्पष्टपणे बोलणे टाळले होते.
अखेर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणाऱ्या प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती मधून अजितदादा विधानसभा लढवणार असे जाहीर केले. त्यानंतर आता अजितदादांच्या प्रचारालाच सुरूवात झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे बारामतीत काका विरुध्द पुतण्या असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.