Baramati News: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात बारामती न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपी शिक्षकाला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. किशोर धनुशा ऊर्फ आप्पाण्णा मधुरे (वय ३४, रा. पुणे) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल देताना आरोपीला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या निर्णयामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
जानेवारी २०२० मध्ये ही घटना घडली होती. आरोपी किशोर मधुरे हा यवतमधील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. शिक्षक असल्याचा फायदा घेत त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला पालकांच्या ताब्यातून दूर नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर खटला बारामती न्यायालयात चालला.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरोधातील विविध पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यामध्ये पीडित विद्यार्थिनीने दिलेली साक्ष, तिच्या वडिलांचा जबाब आणि पालकांची साक्ष महत्त्वाची ठरली. याशिवाय हॉटेलमधील नोंदी, घटनास्थळाचे पंचनामे, जप्त केलेले कपडे, वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासातून समोर आलेल्या बाबींचाही पुराव्यांमध्ये समावेश होता. या सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांची योग्य सांगड घालत आरोपीविरोधातील बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली. अॅड. योगेश लाळकवी यांनी सरकारी पक्षाला सहाय्य केले.
या प्रकरणाचा तपास यवत पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ साहेबराव वाघमोडे यांनी केला होता. यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तासगावकर यांच्यासह पैरवी अधिकारी अभिमन्यू कवडे, कोर्ट कॉन्स्टेबल रियाज मनेरी आणि पोलीस हवालदार वेणुनाद ढोपरे यांनी खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले. एपीजी ऑफिसच्या कारकून सुनीता सतीश कांबळे यांनीही मदत केली.
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी पक्षाने केलेले प्रयत्न आणि न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे दिलेला कठोर निर्णय यामुळे अशा गुन्ह्यांबाबत समाजात स्पष्ट संदेश गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.