Ajit Pawar, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024: अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले; " हा तर आचारसंहितेचा भंग..."

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar On Ajit Pawar: लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. शिवाय उमेदवारांकडून विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशातच आता अजित पवारांचा (Ajit Pawar) एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदारांना पाहिजे तेवढा निधी देऊ, परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं लागेल असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

इंदापूर येथील डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी तुम्हाला काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करेन. पाहिजे तेवढा निधी देईन, परंतु मशीनमध्ये बटनं कचा कचा दाबा, म्हणजे मलाही बरं वाटेल. नाहीतर माझा हातही निधीच्या बाबतीत आखडता होईल. याच वक्तव्याचा आधार घेत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजितदादांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग (Election Commission) अजित पवारांच्या या वक्तव्यावर काय कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलं, 'अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? #मलिदा_गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की, सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!' असं ट्विट करत रोहित यांनी अजितदादांवर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोक पार्सल बाजूला करतात...

याच परिषदेत बोलताना अजित पवारांनी नेहमीप्रमाणे मिश्किल टिप्पणीदेखील केली. ते म्हणाले, मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. शिवाय आताही सरकारमध्ये कामासाठीच गेलो आहे.

मी सत्तेला हपापलेला माणूस नाही. मी अनेक वर्षे अनेक पदांवर होतो. 5 ते 6 वेळा मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. 6 वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. परंतु, अलीकडे आम्ही काम नाही केलं की लोक पार्सल बाजूला करतात, असं अजित पवार म्हणाले.

(Edited By Jagdish )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT