Pune News : महाराष्ट्रात लोकसभेची सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे ती बारामतीची (Baramati Lok Sabha News). पवार कुटुंबातच ही लढाई होत असून, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अजित पवारांकडून मतदारसंघात जुळवाजुळव केली जात असून, त्यात त्यांना यशही मिळाल्याचे दिसत आहे.
पुण्यात आज झालेल्या महायुतीच्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची नावे सांगत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांना मतदारसंघातून मोठं लीड देण्याचे आवाहन केले. त्यातून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ मात्र वगळला. बारामतीमध्ये लीड मिळणार की नाही हे बारामतीकरचं सांगतील, असे अजितदादा म्हणाले.
इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रवीण माने हे एकत्र आल्याने तिथे शंभर टक्के लीड मिळालंच पाहिजे. त्यासाठी ते मदत करत आहेत. पुरंदर-हवेलीमध्ये विजय शिवतारे, अशोक टेकवडे, दिंगबर दुर्गाडे प्रयत्न करत आहेत. तिथेही लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खडकवासला तर नेहमीच भाजपच्या मागे उभा राहिला आहे. तिथे तर रासपचं चिन्ह माहिती नसताना 65 हजारांचं लीड मिळालं. आता सगळ्यांनी काम केले तर लाखाच्यापुढं लीड मिळेल. त्याच पद्धतीने मुळशी, भोर, वेल्हामध्ये कुलदीप कोंडे आपल्यासोबत आहेत. तिथेही चांगले मताधिक्य मिळेल. दौंडमध्ये राहुल कुल, रमेश थोरात, प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे बरोबर आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा शब्द मी देतो, असेही अजित पवार या वेळी म्हणाले. दरम्यान, अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले. ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत येत असल्याचे समजताच अजितदादा म्हणाले, जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भोर, वेल्हा, मुळशीमध्ये त्यांची किती ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ही किमया विजय शिवतारेंनी केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
विरोधक कसा असावा लागतो, हे यांच्याकडे बघून शिका. मित्रही कसा असावा लागतो, तेही विजयबापूंकडे बघून शिका. एकदा मैत्री केली की, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाही. अशा पद्धतीचे काम विजय शिवतारेंचे असल्याचे कौतुक अजित पवारांनी केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.