Pune News : भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. तसेच ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या त्या मातोश्री होत. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारती पवार या माहेरच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचालित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.
भारती पवार यांच्या मागे सून मृणाल अभिजित पवार, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच कन्या अश्विनी, नातू झाकिर असा परिवार आहे.
भारती पवार यांना ‘एक्स’वरून श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘भारती पवार यांनी बालकल्याण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला. चित्रकलेच्या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे म्हटले, तर पवार कुटुंबाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आदींनीही भारती पवार यांना ‘एक्स’वरून श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.