Ajit Pawar sarkarnama
पुणे

रेल्वेला रोखण्यासाठी अजितदादा सरसावले!

अजित पवार (Ajit Pawar) यांनी रेल्वे मालधक्क्याकडे (Bhigwan Maldhakka) जाणारी वाहतूकच बंद करण्याचे आदेश दिले.

मिलिंद संगई :सरकारनामा

बारामती : शहरातील भिगवण रस्त्याला समांतर रस्ता करण्यासाठी रेल्वे प्रशासन जागा देत नसल्याने अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यात लक्ष घालत रेल्वे मालधक्क्याकडे (Bhigwan Maldhakka) जाणारी वाहतूकच बंद करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. रेल्वेला रोखण्यासाठी आता खुद्द उपमुख्यमंत्रीच सरसावल्याने आता रेल्वे विभाग यात काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वेच्या मालकीची जागा सेवा रस्त्यासाठी मिळावी म्हणून बारामती नगरपालिकेने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी वारंवार चर्चा करुन रेल्वेची जमीन सेवा रस्ता करण्यासाठी देण्याची विनंती केली होती. या बाबत रेल्वेच्या अधिका-यांनी अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतरही फार काही केले नाही. ही जमीन देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज थेट आपल्या अधिकारांचा वापर करत रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करुन टाकण्याचे आदेश मिलिंद मोहिते यांना दिले.

या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत असल्याने आजूबाजूला शाळा व विद्यार्थ्यांचा वावर असल्याने तेथे सेवा रस्त्याची गरज आहे. रस्त्यासाठीच रेल्वेची जमिन मागत असताना रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर अजित पवार यांनीच आज निर्णायक भूमिका घेत मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करुन टाकण्याचे आदेश दिले. रेल्वेला मालधक्क्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, येथील वाहतूक बंद झाल्यानंतर रेल्वेचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. आता खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यात निर्णायक भूमिका घेतल्याने रेल्वे विभाग नमती भूमिका घेणार की दुसरी काही भूमिका घेणार या बाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या कामाबाबत अजित पवार कमालीचे आग्रही असतात, ही बाब यापूर्वीही बारामतीकरांनी अनेकदा अनुभवली आहे, आता रेल्वेचे थेट नाक दाबण्याचे काम अजित पवार यांनी केलेले असल्याने पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT