Eknath Shinde : MPSC
Eknath Shinde : MPSC  Sarkarnama
पुणे

MPSC News: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच; मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अचानक रद्द

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही विद्यार्थ्यांनी जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलनावर सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला होता. आता त्याचसंदर्भात एमपीएससी(MPSC)च्या विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते.

या भेटीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबतची शरद पवार आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज (दि.२३) संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इतर कार्यक्रमात व्यस्त असल्यानं ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पण येत्या दोन दिवसांत एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर तोडगा काढला जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.

MPSCच्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहेराज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग लेखी स्वरुपात निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मंगळवारी रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा देखील केली होती. त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार होते.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाजप आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तरीदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पवार मैदानात, मध्यस्थी यशस्वी होणार ?

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेतली. यानंतर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेणार असून मीही त्या बैठकीला उपस्थित राहीन असं आश्वासनही शरद पवार यांनी दिलं होतं.

पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र, जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून राज्य आयोगाऐवजी निवडणूक आयोग उल्लेख...

मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी आंदोलनाविषयी भाष्य करताना राज्य आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्र्याच्या हा गोंधळ उडालेला व्हिडीओ पोस्ट करून, एकप्रकारे त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

"यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले" असा चिमटा राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना काढण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT