Kasba Constituency Sarkarnama
पुणे

Pune News : कसब्यात ब्राह्मण उमेदवारासाठी आग्रह; नेमकी काय आहेत जातीय गणित?

Sudesh Mitkar

Pune News : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमधून ब्राह्मण उमेदवार द्यावा, यासाठी ब्राह्मण संघटनानी आग्रह धरला आहे. त्याबाबतचे विनंती पत्र देखील भाजपाला देण्यात आले आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी देखील ब्राह्मण उमेदवाराचा मुद्दा समोर आला होता.

ब्राह्मण उमेदवार न दिल्याने त्याचा फटका कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला बसल्याचे बोलले गेले. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाकडून उमेदवारीची मागणी करण्यात आल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात नुकतीच ब्राह्मण संघटनांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी एकमताने करण्यात आली. आपल्या पक्षात ब्राह्मण समाजातील काही इच्छुक असून त्यांचा उमेदवारीसाठी विचार करावा, असं या संघटनांनी भाजपच्या वरिष्ठ मंडळींना कळवलं आहे.

त्यामुळे कसब्यातील उमेदवार ठरवताना भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने, धीरज घाटे, कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट अथवा सुनबाई स्वरदा बापट इच्छुक आहेत. विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांमध्ये ब्राह्मण समाजातील इच्छुक सर्वाधिक आहे.

पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर हेमंत रासने यांनी तेव्हापासूनच निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना वाटत आहे. आता ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्याने हेमंत रासने त्यांना तिकीट मिळवण्यात अडचणी येणार असल्याचं बोललं जात आहे. पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाचा रोष उडवून घेतल्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असं ब्राह्मण संघटनांचे म्हणणं आहे. मुळे यावेळेस भाजप या संघटनांचा रोष पत्करणार की ब्राह्मण उमेदवार देणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

सध्या कसब्याची जातीय गणितं पाहिली तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दोन लाख 82 हजार 697 मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ओबीसी मतदार असून त्याची संख्या 35 ते 38 टक्के आहे. त्या खालोखाल 20 ते 22 टक्के मराठा समाज आहे. तर मुस्लिम समाज 12 ते 13 टक्के आहे. मारवाडी समाजाची संख्या देखील या मतदारसंघांमध्ये लक्षणीय आहे. आठ ते दहा टक्के जैन मारवाडी समाज या परिसरात राहतो आणि इतर समाज आठ ते दहा टक्के आहे.

ब्राह्मण समाज देखील 12 ते 13 टक्के या भागात राहतो. मागील काही निवडणुका पाहिल्यास या समाजाची मतं ही निर्णायक राहिल्याचं पाहायला मिळाला आहे. त्यामुळे उमेदवारी बाबत भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT