Uddhav Thackeray  Sarkarnama
पुणे

Pimpri Bjp News : पिंपरीत भाजपला मोठा धक्का; माजी नगरसेवक करणार ठाकरे गटात एन्ट्री

Shivsena Political News : पिंपरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या माजी नगरसेवकाने भाजपची साथ सोडत मंगळवारी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sachin Waghmare

Pimpri News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षांत आता लगीनघाई पहावयास मिळत आहे. त्यातच आता निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काही जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. पिंपरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या माजी नगरसेवकाने भाजपची साथ सोडत मंगळवारी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी नगरसेवक रवी लांडगे मंगळवारी (20 ऑगस्ट) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pimpri Bjp News)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजविली होती. महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी लांडगे पुढे आले होते.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.

2017 साली ते प्रथमच भाजपकडून नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. पण, गेल्या 5 वर्षात महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना कुठलेच पद न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम केला. मंगळवारी रवी लांडगे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेतील भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करीत पिंपरीत भाजपला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजोघ वाघेरे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश करीत मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना विद्यमान खासदार बारणे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता रवी लांडगे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे गटाने धक्का दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT