Anup More & Ravikant Varpe Sarkarnama
पुणे

'सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेमुळे राष्ट्रवादीची माती झाली'

पक्ष सोडून गेले त्यांचा समाचार आगामी निवडणूकीत घेण्याचे आवाहन रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : ओबीसींचे राजकीय आऱक्षण (OBC Political Reservation) रद्द होण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) एकमेकांवर होत आहे. त्यावरून पिंपरी-चिंचवडमधील या पक्षांच्या फादर बॉडीतील पदाधिकारी एकमेकांना भिडले आहेत. आता या दोन्ही पक्षांचे युवक पदाधिकारीही महापालिका निवडणूक (PCMC Election-2022) तोंडावर आल्याने या लढाईत उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीच शहरात धुरळा उडाला आहे.

पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवताना पालिकेचे टेंडर, भाजपचे पदाधिकारी, नेते व्हेंडर, अशी बोचरी टीका युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी बुधवारी (ता.8 डिसेंबर) केली होती. त्यांच्या या टीकेचा समाचार दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.9 डिसेंबर) भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे (Anup More) यांनी घेतला. 'सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता' यामुळे राष्ट्रवादीची माती झाली, अशी चपराक त्यांनी लगावली.

शहर युवक राष्ट्रवादीने पिंपरी पालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीचा पर्दाफाश करण्यासाठी अधिक आक्रमक होऊन पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शहर युवक बैठकीत करताना वरपेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता. पालिकेत ज्यांना सत्तेची पदं दिली ते पक्ष सोडून गेले त्यांचा समाचार आगामी निवडणूकीत घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, 2017 नंतर या शहरात भाजपाने कोणता मोठा प्रकल्प आणला, हे सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. पिंपरी पालिकेतील भाजपची भ्रष्टाचारी राजवट राज्यभर गाजत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकने अनेक टेंडर केले. त्यातील बहुतांशी टेंडरचे भाजप पदाधिकारी वेंडर भागीदार आहेत. या महापालिकेत मनपाचे टेंडर, भाजपा वेंडर अशी परिस्थिती आहे. शहरातील सर्व सामान्य नागरिकांना याचा काहीच फायदा झाला नाही. परंतू भाजपाचे पदाधिकारी मात्र स्मार्ट झाले, असा हल्लाबोल वरपेंनी केला होता.

त्याच्या या टिकेचा समाचार मोरेंनी घेतला. त्यांनी वरपेंवर सडकून टिका केली. बाहेरच्यांनी शहरात येऊन उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. तब्बल पंधरा वर्षे पिंपरी पालिकेत एकहाती सत्ता भोगून राष्ट्रवादीने नागरिकांच्या पैशांचा मलिदा लाटला. प्रत्येक निविदेत आपल्याच बगलबच्च्यांना कामाला लावून पालिका लुटून खाल्ली. राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या स्थानिक पदाधिका-यांनी पालिकेला कंगाल केले. एवढे करूनही ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको’याप्रमाणे राष्ट्रवादी आव आणित आहे. सत्तेचा गैरवापर करून आपल्याच बगलबच्च्यांना पोसण्याचा उद्योग त्यांनी केला. ‘सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’असा राष्ट्रवादीचा जुलमी कारभार नागरिकांनी पंधरा वर्षे सहन केला. ‘आति तिथे माती’अशातला प्रकार होऊन पालिकेतील भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता 2017 ला नागरिकांनी पलटवून बहुमताने भाजपाला निवडून दिले. भाजपाने केलेली विकासकामे पिंपरी-चिंचवडकरांना महिती आहेत. त्यामुळे बाहेरच्या कोण्या व्यक्तीने शहरात येऊन भीतीचे वातावरण तयार करण्याची गरज नाही, असा प्रतिहल्ला मोरेंनी चढवला.

राष्ट्रवादीच्या पापिष्ट कारभारामुळे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत असल्याचा आरोप मोरेंनी केला. तो आता सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, राज्यातील बिघाडी सरकारच्या हुकूमशाहीमुळे या प्रकल्पाला विलंब होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकहूकुमी कारभारामुळे मावळातील पवना जलवाहिनी प्रकल्प गुंडाळला गेला. त्यामुळे शहरातील नागरिकांना आज दिवसाआड पाणी मिळत आहे, असे ते म्हणाले. भाजप सत्तेतून कदापी हटणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT