Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

शरद पवारांनी मेट्रोचा दौरा काय केला; भाजप नेते आणणार हक्कभंग

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोच्या (Pimpri -Chinchwad) कामाची सोमवारी (ता.१७ जानेवारी) सकाळी पाहणी दौरा केला. दुपारनंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहे. पुणे आणि पिंपर-चिंचवड महापालिकातील (BJP) सत्ताधारी भाजपचे (BJP) महापौर, पदाधिकारी, त्यांचे आमदार, खासदार यांना या पाहणीत डावलण्यात आल्याने भाजप संतापली आहे.

राष्ट्रवादीच्या (NCP) या आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दुपारी संतापून सांगितले. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने मेट्रोविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर सायंकाळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे (PCMC Mayaor Usha Dhore) यांनीही झाला प्रकार चुकीचा असल्याचे सांगत त्याचा निषेध केला व या घटनेविरुद्ध म्हणजे मेट्रोविरुद्ध केंद्र सरकारकडे (Central Government) तक्रार करणार असल्याचे सांगत त्याची नक्की दखल घेतली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, एकाच वेळी होणार असलेल्या पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या निवडणूका तोंडावर आल्याने मेट्रोवरून श्रेयाचे राजकारण भाजप आणि राष्ट्रवादीत रंगले आहे. यापूर्वी अनेकदा मेट्रोच्या ट्रायल झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. मात्र, त्यावेळी आऱोप, प्रत्यारोप झाले नव्हते. मात्र, आता पालिका निवडणूक जवळ आल्याने श्रेयबाजी रंगली आहे.

मेट्रोचे श्रेय भाजपच असल्याचा दावा पवारांच्या पाहणीनंतर पाटलांनी केला. तर, पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या प्रकल्पाला मंजूरी मिळाली. तसेच त्यासाठी पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी दिला, असे सांगत मेट्रो श्रेय राष्ट्रवादीकडे घेण्याचा प्रयत्न या पक्षाचे पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला. तसेच पुणे मेट्रोचे नामकरण पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे करण्याची मागणी पुन्हा त्यांनी केली आहे. तर, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पाटील यांना मेट्रोविरुद्ध खरंच हक्कभंग आणावा, असे आव्हान दिले. त्यातून त्यांचा मेट्रोला असलेला विरोध आपसूक स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. मेट्रो सुरु होणार म्हणून, खरं त्यांना कौतूक पाहिजे. पण त्याऐवजी त्यांना दुख वाटत असल्याबद्दल शितोळे यांनी आश्चर्य व्यक्त केले. शरद पवार आले म्हणून त्यांचं दुखतंय की पालिकेतील सत्ता जाणार म्हणून दूखू लागलंय, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा पहिला टप्पा गत वर्षाच्या शेवटी सुरु होणार, असे प्रथम महामेट्रोने जाहीर केले होते. मात्र, आता या महिन्याअखेरची डेडलाईन त्यासाठी देण्यात आली आहे. म्हणून पवार यांनी सोमवारी (ता.17जानेवारी) सकाळी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तिकिट काढून कासारवाडी ते पिंपरी असा मेट्रो प्रवासही केला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी दुपारी विरोधी प्रतिक्रिया दिली. तर, सायंकाळी ढोरे यांनीही तसेच मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, पुणे महामेट्रोच्या अधिका-यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांचे महापौर, पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा माहिती न देता गुप्तपणाने पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांनी मेट्रोची ट्रायल रन घेतली. त्यांच्या या कामकाजातून दुटप्पीपणाची भूमिका व वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या कोरोना संकटात मेट्रोची ट्रायल रन घेणे कितपत योग्य व रास्त आहे. त्यामुळे त्यातूनल महामेट्रोचा हेतू व उद्देशाबाबत शंका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच, ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पुणे महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ही कृती लोकशाहीचा अवमान करणारी आहे. त्यांच्या गलथान व गैरजबाबदार कारभाराबद्दल आम्ही असमाधानी असून त्याबद्दल लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे पालिकेच्या वतीने तक्रार करणार आहे. पुणे महामेट्रोच्या कामकाजाबद्दल आम्ही नाराज असल्याने त्यांचा निषेधही करीत आहोत. असे महापौर ढोरे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT