BJP Uma Khapre Latest Marathi News
BJP Uma Khapre Latest Marathi News Sarkarnama
पुणे

उमा खापरेंना चंद्रकात पाटलांआधी भाजपच्या एका नेत्यानं आधीच सांगितलं होतं!

उत्तम कुटे

पिंपरी : विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील उमा खापरे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं ठरलं आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चाही नव्हती. पण भाजप नेतृत्वानं अचानक त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावललं. खापरे यांच्यासाठीही हा धक्का होता. (Uma Khapre Latest Marathi News)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याआधी भाजपचे संघटक व विधान परिषदेतील दुसरे उमेदवार श्रीकांत भारतीय यांनी तिकीट मिळणार असल्याचं खापरेंना सकाळीच सांगितलं होतं. कारण खापरे यांनी तिकीटासाठी प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे भारतीय यांचं ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. नंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन करताच त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. (Uma Khapre gets ticket for legislative Council)

त्यानंतर त्यांच्या घरी अभिनंदनासाठी रीघ लागली. माझ्यासारख्या कार्यकर्तीला न्याय दिल्याबद्दल व दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय कमिटीला धन्यवाद दिले. हे फक्त भाजपमध्येच घडू शकते, असे त्यांनी सरकारनामाला सांगितले. अकल्पित व अचानक सारे घडल्याने आता निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

खापरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याचे आव्हान काहीशा नेमस्त स्वभावाच्या खापरेंनी दिल्याने नुकत्याच त्या चर्चेचा विषय झाल्या होत्या.

खापरे या गोपीनाथ मुंडेंच्या समर्थक

गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडला तिसरा आमदार मिळणार आहे. तीन विधानसभा मतदारसंघ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत महेश लांडगे, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप असे भाजपचे दोन आमदार आहेत. त्यातील जगताप हे भाजपमध्ये येण्यापूर्वी विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्यानंतर आता खापरे या विधानपरिषदेवरील शहरातील दुसऱ्या आमदार ठरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT