Dilip Mohite Patil News
Dilip Mohite Patil News  Sarkarnama
पुणे

Khed APMC News : आमदार मोहिते विरोधकांचा एक होण्याचा आणखी एक प्रयत्न खेड बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत फसला

उत्तम कुटे: सरकारनामा

Khed Bazar Samiti News : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत बहूमतातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते-पाटील (MLA Dilip Mohite Patil) यांच्या पॅनेलने अपेक्षेनुसार बाजी मारली. त्यातून पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध एक होण्याचा त्यांच्या सर्वपक्षीय विरोधकांचा आणखी एक प्रयत्न फेल गेला. ही निवडणूक बिनविरोध न केल्याने हात दाखवून त्यांनी अवलक्षण करून घेतले.

खेड बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या निवडणुकीत आमदार मोहितेंच्या पॅनेलने १८ पैकी १० जागा जिंकून बहूमत मिळवले होते. त्यामुळे आजची सभापती, उपसभापतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. तरीही त्यांच्या विरोधकांनी उमेदवार दिल्याने ती झाली. परिणामी तीन आठवड्यांत पुन्हा त्यांना आणखी एका मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे (NCP) सभापती, उपसभापती दहा विरुद्ध सात मतांनी निवडून आले. त्यांची सत्ता कायम राहिली.

आमदार मोहितेंच्या सर्वपक्षीय विरोधकांनी लढवायची म्हणून बाजार समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक लढविल्याचे दिसून आले आहे. कारण त्यासाठी त्यांनी कसलीच पूर्वतयारी केल्याचे आढळले नाही. त्यातून त्यांना प्रतिस्पर्धी पॅनेलचे एक मतही फोडता आले नाही. परिणामी त्यांचे २६ दिवसांतच पुन्हा हसे झाले. कारण २८ एप्रिलला बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत ते मोहितेंविरुद्ध एकवटले होते. त्यासाठी कट्टर राजकीय वैरी असलेल्या दोन्ही शिवसेना, भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) एकत्र आले होते.

तरीही त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यातून ते धडा घेतील असे वाटले. पण, तसे झाले नाही आणि आज पुन्हा त्यांचा पराजय झाला. मोहितेंविरुद्ध एक होण्याचा त्यांचा आणखी एक प्रयत्न फसला. बाजार समितीच नाही, तर पूर्ण खेड तालुक्यावर मोहितेंचे २००४ पासून वर्चस्व राहिलेले आहे. सगळे विरोधक एकत्र येऊनही विधानसभेसह जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेत त्यांनी यश मिळविलेले आहे. २०१४ चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांच्या विरोधकांना यश आलेले नाही.

मोहितेंनीच सभापती व्हावे, असे त्यांच्या सर्व संचालकांची भावना होती. पण, आमदार असल्याने आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून ते त्यापासून दूर राहिले. तसेच २०२४ चे विधानसभेची व्यूहरचना त्यांनी या निवडणुकीतून हुषारीने केल्याचे दिसले. मोहिते हे तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. त्यामुळे पदवाटपात पश्चिम पट्यावर अन्याय झाला, अशी भावना निर्माण होऊ न देण्याची काळजी त्यांनी या बाजार समिती निवडणुकीतून घेतली. कारण सभापती, उपसभापतीपदाचे दोन्ही उमेदवार त्यांनी पश्चिम तालुक्यातील दिले.

तसेच हे पद फक्त वर्षभरासाठी ठेवून तेथे निवडून आलेल्या आपल्या सर्व संचालकांना ते संधी देणार असल्याने त्यातून कोणी नाराज राहणार नाही, याचीही काळजीही त्यांनी घेतली आहे. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या भागातील (आसखेड) कैलास लिंभोरे यांना सभापती करून त्यांना एकप्रकारे मोहिते यांनी शह दिला आहे. दरम्यान, आता त्यांचे विरोधक पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेला पुन्हा एकत्र येऊन काय नवीन चाल खेळणार याकडे खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT