Pune News : लोकसभेला दिल्लीचा 'मास्टर प्लॅन' वापरून देखील भाजपनं सपाटून मार खालला. त्यानंतर भाजप पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची शिदोरी सोबत ठेवून नव्या प्लॅनने विधानसभा काबीज करण्याचे ध्येय भाजपचे आहे.
यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah ) उद्या ( रविवारी )त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा 'मास्टर प्लॅन' सह पुण्यात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला ( bjp ) 'बॅक फूट'वर जावं लागल्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत यावर मंथन केले. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मित्र पक्षांन विरोधात तक्रारीचा पाऊस पाडल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष असल्याने त्याने जागावाटप निश्चित करून उमेदवार देखील जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर आता विधानसभेचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजप सज्ज झाला असून त्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह उद्या पुण्यात दाखल होत आहेत
पुण्यात भाजपची चिंतन बैठक होणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळेच आता 'लक्ष्य विधानसभेचे' अशी बॅनरबाजी देखील भाजपकडून पुण्यात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
अमित शाह या बैठकीत पाच हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा कानमंत्र देणार आहेत. लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपच्या बदललेल्या रणनीतीची या बैठकीत चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना देखील योग्य उमेदवार निवडण्यासाठी आग्रह धरायचा, असा काहीसा प्लॅन भाजपचा असणार असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभेतील पराभवानंतर भाजपने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आहे. लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला नेमका कुठे फटका बसला? कोणत्या भागात किती मते मिळाली? महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कोणत्या बूथवर अधिक मतदान झाले? या भागात झालेल्या मतदानावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते काय आहेत? हे जाणून आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कोणता उमेदवार योग्य ठरेल? जातीय समीकरणं काय असतील? यांची चाचपणी करण्यात आली. भाजपकडून करण्यात आलेल्या या अहवालाच्या आधारेच गृहमंत्री शाह हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठीचा 'मास्टर प्लॅन' समजून सांगणार असल्याचं बोललं जात आहे. पण, या 'मास्टर प्लॅन'चा किती 'इफेक्ट' होणार हे विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर समजणार आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.