Ramesh Thorat

 

Sarkarnama

पुणे

माझ्या बिनविरोध निवडीसाठी भाजपनेच पुढाकार घेतला : रमेश थोरात

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत माझ्या बिनविरोध निवडीसाठी भाजपने पुढाकार घेतला

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी (pdcc bank) दौंड तालुक्यातून माझी बिनविरोध निवड करण्यासाठी विरोधकांनीच (भारतीय जनता पक्ष) पुढाकार घेतला. भाजप पुरस्कृत उमेदवाराने तर फोन करून माघार घेत असल्याचे कळविले होते, अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी दिली. (BJP took the initiative for my unopposed election: Ramesh Thorat)

दौंड शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी ही माहिती दिली. थोरात म्हणाले, ‘‘ पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचा संचालक म्हणून मी १९८४ पासून काम पाहत असून कोणाचीही अडवणूक न केल्याने एक अपवाद वगळता माझी बिनविरोध निवड झालेली आहे. बॅंकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असल्याने ठेवी आणि कर्जवाटपात वाढ झालेली आहे. यंदा विरोधकांनी मदत केली आणि ‘अ’ गटातून (विकास सोसायटी मतदारसंघ) बिनविरोध करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. मदत करणाऱ्या विरोधकांपैकी कोणा एकाचे नाव घेऊ शकत नाही; परंतु सर्व विरोधकांनी मदत केली.’’

ते म्हणाले की, ‘‘जिल्हा बॅंकेसाठी दौंड तालुक्यास संचालकपदाच्या दोन जागांची मागणी केली होती. ‘अ’ गटातून मी आणि दुसऱ्या जागेसाठी दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे व जिल्हा दूध संघाचे माजी संचालक रामभाऊ टूले यांच्यापैकी एका नावासाठी आग्रह होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी तालुक्यास एकच जागा दिली. दोनऐवजी एकच जागा का दिली?, याविषयी आम्ही पक्षश्रेष्ठींनी विचारले नाही आणि विचारूही शकत नाही. ’’

दौंडचे विद्यमान भाजप आमदार तथा बॅंकेचे माजी संचालक राहुल कुल यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक तर लढविली नाहीच पण त्यांच्या समर्थकाने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या या भूमिकेमुळे आगामी पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती व दौंड नगरपालिका निवडणुकीसाठीदेखील भाजप याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याची शक्यता बळावली आहे.

सहा वर्षांपासून थोरात बॅंकेचे चेअरमन

रमेश थोरात हे १९८४ पासून जिल्हा बॅंकेचे संचालक असून त्यांनी बॅंकेचे उपाध्यक्षपद आणि सहा वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. २१ मे २०१५ पासून सलगपणे ते आजअखेर बॅंकेचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. उपमुख्यमंत्री तथा जिल्हा बॅंकेचे संचालक अजित पवार यांचे निष्ठावंत सहकारी असणारे रमेश थोरात हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे संचालक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT