Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Kasba Peth : फडणवीसांनी कसब्याच्या पराभवाचं पोस्टमार्टेम केलं; आता रिपोर्टचा फटका कुणाला बसणार?

ब्रिजमोहन पाटील

Pune News : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत जे झाले ते विसरून जा आणि झालेल्या चुका सुधारून पुन्हा कामाला लागा. पुढच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवा, असे सांगितले होते.

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवावर भाष्य केलं आहे. कसब्याचे पोस्टमार्टेम आम्ही केलं आहे, त्यानुसार आता योग्य काळजी घेऊ, असं फडणवीसांनी सांगितलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ''एखादी निवडणूक जिंकतो किंवा हारतो. त्यामुळे फार काही फरक पडतो असे मी मानत नाही. मात्र, प्रत्येक निवडणुकीनंतर विजयाचे किंवा पराजयाचे आम्ही मूल्यमापन करत असतो.

हेच दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचं पोस्टमार्टेम करतो. आम्ही कसब्याबाबत ते केलं आहे. त्यानुसार आता भविष्यात जी काळजी घ्यायची ती योग्य पद्धतीने घेऊ'', असं ते म्हणाले.

दरम्यान, कसब्याचे पोस्टमार्टेम आम्ही केलं, त्यानुसार आता योग्य काळजी घेऊ, असं फडणवीसांनी सांगितल्यामुळे कसब्यातील पराभवाच्या रिपोर्टचा फटका नेमकी कुणाला बसणार? हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

सध्या अनेक जिल्‍ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ''दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, त्याचे पंचनामे आता सुरू झालेत. हे काम पूर्ण होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेताचा फोटो काढला तरी आम्ही तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरणार आहोत '', असंही ते यावेळी म्हणाले.

''मला तर याचं आश्‍चर्य वाटतं की आम्ही विरोधकांच्या काळातील पैसे आता देत आहोत. हेच आता पाऊस रात्री पडला तरी सकाळी ते पंचनामा झाला नाही म्हणून गोंधळ घालत आहेत. एवढ्या वेगाने पंचनामा त्यांनी तरी कधी पाहिलाही नसेल. विरोधकांनी यावर तरी राजकारण करणे योग्य नाही '', अशी टीका फडणवीसांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT