दत्तात्रय कदम
मांडवगण फराटा (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे (bjp) शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना दिली. गेल्या काही दिवसांपासून ते राजीनामा देणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती, फराटे यांच्या राजीनाम्याने आज (ता. १४ फेब्रुवारी) त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (BJP's Shirur taluka president Dada Patil Farate resigns his post)
शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दादा पाटील फराटे यांनी भाजप तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे कोणी काही बोलत नव्हते. अखेर दादा पाटील फराटे यांनीच या वृत्ताला दुजोरा देत पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपविला असल्याचे सांगितले.
याबाबत फराटे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम निष्ठेने पार पाडत होतो. काम करत असताना स्वार्थाची भूमिका कधीच ठेवली नाही. गेली दोन वर्षे माझ्याकडे शिरूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार सातत्याने शिरूर तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या माझ्या कौटुंबीक जबाबदारीमुळे मला तालुकाध्यक्षपदासाठी वेळ देणे शक्य होत नाही. काम करायला पुरेसा वेळ मिळत नाही. या अडचणीमुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे.
पुढील राजकीय वाटचालीबाबत दादा पाटील यांनी म्हटले आहे की, पद असो अथवा नसो आजपर्यंत निष्ठा ठेवून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे यापुढील काळात कोणत्या पक्षात जायचे, याचा अद्याप विचार केला नाही, असे सांगत त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
दादापाटील फराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचे कामकाज पाहिले आहे. तसेच, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. दादा पाटील फराटे यांनी राजीनामा दिल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय राहणार, तसेच तालुक्यात मोठ्या घडामोडी होऊन राजकारणाची गणिते बदलणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.