पुणे

डाॅ. अमोल कोल्हे : अडचणीच्या काळात राष्ट्रवादीसमोर ओअॅसिस

राष्ट्रवादीचे एकामागून एक खंदे शिलेदार सध्या पक्ष सोडून जात आहेत. अगदी अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे की पक्षात नेतृत्व करायला म्हणून पवार कुटुंबियांव्यतिरिक्त दुसऱ्या फळीत एकही नवा चेहरा उरलेला नाही. विधानसभेच्या निवडणूका अगदीच समोर येऊन ठेपल्या असतांना एकीकडे पक्षाला लागलेली घरघर थांबवणे आणि दुसरीकडे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना उमेद देण्याच्या दुहेरी कोंडीत राष्ट्रवादी पक्ष अडकलेला दिसून येतोय. अशावेळी नुकतीच पक्ष बांधणीची आणि आगामी निवडणुकीच्या प्रचार यात्रेची जबाबदारी पक्षात नव्याने सहभागी झालेल्या आणि दणक्यात निवडून येऊन खासदार झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आली आहे.

शीतल पवार

विधानसभा निवडणुकीचं वार सुरु झालं आणि विरोधी पक्षांना गळती लागली. निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या पक्षांतराचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. राष्ट्रवादीचे एकामागून एक खंदे शिलेदार सध्या पक्ष सोडून जात आहेत. अगदी अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे की पक्षात नेतृत्व करायला म्हणून पवार कुटुंबियांव्यतिरिक्त दुसऱ्या फळीत एकही नवा चेहरा उरलेला नाही. विधानसभेच्या निवडणूका अगदीच समोर येऊन ठेपल्या असतांना एकीकडे पक्षाला लागलेली घरघर थांबवणे आणि दुसरीकडे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना उमेद देण्याच्या दुहेरी कोंडीत राष्ट्रवादी पक्ष अडकलेला दिसून येतोय. अशावेळी नुकतीच पक्ष बांधणीची आणि आगामी निवडणुकीच्या प्रचार यात्रेची जबाबदारी पक्षात नव्याने सहभागी झालेल्या आणि दणक्यात निवडून येऊन खासदार झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आली आहे. त्यांची लोकप्रियता बघता राष्ट्रवादीला पडझडीच्या काळात लागलेला हा जॅकपॉटच म्हणावा लागेल. 

अभिनेते डॉ अमोल कोल्हे: उच्चशिक्षित 'पॉप्युलर' चेहरा
शिक्षणाने डॉकटर, पेशाने अभिनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघातून सलग तीन वेळा खासदार असलेल्या आढळरावांना पराजित करून खासदार झाले. त्यांच्या या विजयात स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांइतकाच वाटा त्यांच्या छत्रपती संभाजी मालिकेतून तयार झालेल्या पॉप्युलॅरीटीचा होता हे नक्की. कोल्हे यांनी 'संभाजी' मालिकेतून मराठ्यांच्या इतिहासातील संवेदनशील पात्राला न्याय दिल्याची भावना जनमानसात आहे. या मालिकेमुळे मराठा आणि बहुजन मते एकाचवेळी आपल्याकडे खेचणे कोल्हेंना सोपं गेलं. लोकसभा निवडणुकीत आपसूकच जातीच्या मुद्द्यांवर गणित आखताना विरोधक अडचणीत आले. 'ते अभिनेते त्यांचा जनसंपर्क होणे कठीण' वगैरे टीका कोल्हेंनी निवडणुकीनंतरही जनसंपर्क कायम ठेऊन मोडीत काढली. नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनात कोल्हेंनी बैलगाडा शर्यत ते शेती प्रश्नासारखे महत्वाचे प्रश्न मांडून सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे खासदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असतांनाच त्यांना पक्षाकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. 

लोकांच्या कोल्हेंकडून अपेक्षा असतील.. 
पक्षाकडून मिळालेली ही जबाबदारी खरंतर कोल्हेंसमोर आवाहन असेल. ६ ऑगस्टपासून 'शिवस्वराज्य' यात्रा सुरु होतेय. हि यात्रा कोल्हे यांचीच संकल्पना असल्याचे समजते. यातून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी तर आहेच. तसेच निवडणुकीसाठीच पक्षाचं धोरण आणि संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही कोल्हेंवर असेल. हे 'नॅरेटिव्ह सेट' करतांना केवळ सरकारवर टीका न करता, प्रश्न आणि त्यावरची उत्तरही त्यांनी मांडणे अपेक्षीत आहे. तरुण आणि महिला संघटनेला रचनात्मक कार्यक्रम देऊन त्यांना प्रेरणा देण्याचं कामही त्यांना करावं लागेल. यात त्यांच्या 'पॉप्युलॅरिटी'चा नक्कीच फायदा होईल. एकीकडे लोकप्रियता वाढत असतांना दुसरीकडे पक्षातील जेष्टांना सांभाळून घेण्याची दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार हे निश्चित.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अमोल कोल्हे
राष्ट्रवादी पक्षाची सर्वसामान्यपणे मराठ्यांचा पक्ष अशी ओळख अधिक राहिली आहे. पक्षाची ही प्रतिमा मोडून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पक्ष संघटनेत सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांच्या सारख्या नेतृत्वाला दिलेली संधी हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आखलेल्या 'शिवस्वराज्य' यात्रेसाठी अमोल कोल्हेंची निवड कारण्यामागेही असेच कारण असावे. 

पक्षाच्या 'अनिश्चित' धोरणांमुळे दुरावलेला मराठा समाज, विस्कळीत ओबीसी नेतृत्व, हरवलेला ग्रामीण संपर्क आणि पक्षापासून कायम अंतर ठेवून असलेला शहरी मध्यम वर्ग अशा सर्व पातळ्यांवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोल्हेंपेक्षा उजवा चेहरा सध्या तरी पक्षाकडे नाही. त्यामुळे उद्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून अभिनेते डॉकटर अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली तर नवल वाटू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT