Laxman Jagtap News
Laxman Jagtap News  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad News: उमेदवारी वरुन चिंचवड भाजपात दोन गट; अश्विनी जगतापांना उमेदवारी मिळाली तरच काम करणार!

सरकारनामा ब्यूरो

Chinchwad Assembly Constituency News : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) तथा भाऊ यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तेथे भाऊंच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी मिळाली, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्याला चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) भाजपच्या एका गटाने दुजोरा दिला.

पतीच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पत्नीला उमेदवारी दिली, तर विजय मिळतो, अन्यथा पराभव पदरी येतो, हा इतिहास आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच २०२२ ला झालेल्या अंधेरी (पूर्व) मुंबईच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (बाळासाहेब उद्धव ठाकरे) ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांचे पती रमेश लटके हे या मतदारसंघाचे आमदार होते.

तर, त्याउलट अनुभव पंढरपूर-मंगळवेढ्यात त्याअगोदर आलेला आहे. तेथे भरतनाना भालके यांची पुण्याई त्यांचे पूत्र भगिरथ यांच्या कामी आली नाही आणि भाजपचे (BJP) समाधान आवताडे यांनी २०२१ च्या पोटनिवडणुकीत बाजी मारली होती. हा अनुभव जमेस धरून चिंचवडला अश्वनी यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, अश्विनी यांना उमेदवारी मिळाली, तर विरोधी पक्ष सुद्धा उमेदवार देण्याची शक्यता नाही. जरी त्यांनी तो दिला, तरी अश्विनीताईंसाठी संपूर्ण भाजप एकजुटीने विजयासाठी प्रयत्न करेल, असे भाजपच्या चिंचवडमधील दुसऱ्या गटातून सांगण्यात आले. १४ असंतुष्ट नगरसेवकांचा हा गट राज्यातील सत्तांतरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार होता. त्याची चाहूल देवेंद्र फडणवीसांना लागताच त्यांनी हे पक्षांतर रोखले होते. अश्विनी यांना उमेदवारी दिली, तर काम करू, असे या गटातील एका नाराज नगरसेवकाने आज 'सरकारनामा'ला सांगितले. तसं झालं, तर चिंचवडमधून जगतापांचा चौकार बसणार आहे.

कारण हवेली या राज्याच्या सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ ला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या नव्या तीन मतदारसंघाची निर्मिती झाली. तेथील लक्ष्मण जगताप हे पहिले आमदार ठरले. त्यांनी २००९ ला अपक्ष म्हणून बाजी मारली. तर, त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी होत आमदारकीची त्यांनी हॅटट्रिक केली होती.

त्यामुळे, जर त्यांच्या कुटुंबातील कोणी, यावेळी विजयी झाले, तर तो या कुटुंबाचा आमदारकीचा चौकार बसणार आहे. तसेच, जर, अश्विनी जगताप उमेदवार असतील, तर ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. तसे झाले, तर या मतदारसंघात प्रथमच बिनविरोध निवडणुकीचाही इतिहास तथा विक्रम होणार आहे.

मात्र, भाऊंच्या पत्नी उमेदवार नसतील, तर मात्र भाजपला चिंचवडमध्ये विजयासाठी झुंजावे लागेल. कारण तेथील पक्षातील असंतुष्ट गट त्या स्थितीत प्रचार न करता शांत बसण्याची शक्यता आहे. गतवेळी २०१९ ला लक्ष्मण जगतापांना आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार प्रतिस्पर्धी नसतानाही अपक्ष शिवसेना बंडखोर राहूल कलाटे यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

यावेळी, तर मातब्बर भाऊच उमेदवार नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे (NCP) अनेक तालेवार इच्छूक असून त्यातील एकाने, तर सोशल मिडियात आताच रणशिंगही फुंकले आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याचा वचपा काढण्याची संधी राष्ट्रवादीला चिंचवडमध्ये चालून आली आहे. फक्त ते ती घेतात का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT