केडगाव (जि. पुणे) : दौंड तालुक्यातील पारगाव येथील रेणूकादेवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संचालकांवर कोयत्याने वार झाले होते. त्यावेळी राडा घालणाऱ्या सहा जणांविरुद्ध यवत पोलिसांनी १२ कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड येथील उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) माजी पदाधिकारी विकास ताकवणे यांचा समावेश आहे. याबाबतची तक्रार दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम उर्फ पोपटराव ताकवणे यांचा मुलगा रामकृष्ण ताकवणे यांनी दिली होती. (Case filed against former NCP office bearer Vikas Takwane in daund )
दरम्यान, विकास ताकवणे पिंपरी चिंचवड आणि दौंड राष्ट्रवादीमधील बडी हस्ती मानली जात होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने तिकिट न दिल्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. तत्पूर्वी ते राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य होते. त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादीच्या तिकिटावर पिंपरीत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली होती.
रामकृष्ण ताकवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, रेणुकादेवी दूध डेअरीच्या अध्यक्षपदाची शनिवारी (ता. १५ जानेवारी) निवड होती. उद्योजक विकास ताकवणे आणि त्यांच्या पाच गुंडांनी या निवडणुकीच्या वेळी संस्थेच्या प्रवेशद्वारावर दहशत निर्माण करून संचालकांना मतदानाला जाण्यासाठी मज्जाव केला होता. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता त्या गुंडांनी आम्हाला विकास ताकवणे यांनी पाठवले आहे. या निवडणुकीत तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे सांगितले होते.
विशेष म्हणजे या वेळी एका गुंडाच्या हातात कोयता आणि इतर गुंडांच्या हातात दगडगोटे होते. त्या वेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये एका गुंडाने रामकृष्ण ताकवणे यांच्यावर कोयता उगारला होतो. तो कोयता तुकाराम ताकवणे यांनी वरच्या वर धरला होता. त्या वेळी कोयता हाताला लागल्याने तुकाराम ताकवणे हे जखमी झाले होते. रामकृष्ण याचा चुलतभाऊ युवराज ताकवणे यालाही कोयत्याने मारल्याने उजव्या डोळ्याजवळ जखम झालेली आहे. या वेळी गुंडांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व गुंड एम.एच.१२ के आर ९२९२ या फॅारच्युनर गाडीतून आले होते, असे फिर्यादीत रामकृष्ण ताकवणे यांनी नमूद केलेले आहे.
या संदर्भात पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, रस्ता अडवून मतदानापासून परावृत्त करणे, दमदाटी, शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे, दहशत निर्माण करणे अशा बारा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.