Daund, 01 August : तीन आमदारांना धमकाविणारा दौंडचा माजी नगराध्यक्ष बादशाह शेख याच्यासह ११ जणांवर दौंड शहरातील एका तरुणीच्या कुटुंबीयांना पिस्तूलाचा धाक दाखवून तिचे अपहरण, दरोडा, विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यावर याअगोदरही गुन्हे दाखल झालेले आहेत.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ता. २८ जुलै रोजी मध्यरात्री दौंड शहरातील एका तरुणीच्या घरी जाऊन तिचे अपहरण करण्यात आले. हातात कोयते, तलवार घेऊन आलेल्या संशयित आरोपींनी तरुणीच्या आईला मारहाण करून आणि डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. हातातील कोयते व तलवारींचा धाक दाखवून टोळक्याने घरात जबरदस्तीने प्रवेश केला.
या टोळक्याने कपाटातील रोकड आणि तरुणीच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. जातीवाचक शिवीगाळ करून टोळक्याने तरुणीला उचलून एका पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई वेर्ना मॅाडेल असलेल्या मोटारीमध्ये डांबून घेऊन निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार तरुणीच्या आईच्या डोक्याला पिस्तूल लावणारा नदीम अन्वर शेख ( रा कुंभार गल्ली, दौंड) याच्यासह बादशहा आदम शेख ( रा. कुंभार गल्ली दौंड), शफीक मुलाणी (रा. मळद, ता. दौंड), इरफान ऊर्फ वसीम अन्वर शेख (रा. सेंट सेबॅस्टियन स्कूल जवळ, दौंड), फैजल मेहफूज काझी (रा. नेने चाळ, दौंड), अशपाक समीर शेख ( रा. भीमनगर, दौंड), आफताब समीर शेख (रा. भीमनगर, दौंड), आरबाज अन्वर शेख ( रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण व दरोडा प्रकरणातील ११ संशयित आरोपींविरुद्ध अपहरण, दरोडा टाकणे, घरात अतिक्रमण करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग असे गुन्हे दाखल झाले आहेत. दौंड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस तपास करीत आहेत.
बलात्कार प्रकरणात मुलाला मदत
बादशहा शेख हा माजी नगराध्यक्ष असून दौंड बाजार समितीचा माजी संचालक आहे. ता. २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका तरुणीचा विनयभंग करून त्या पीडितेसह कुटुंबातील महिला आणि तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बादशहा शेख याच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मुलगा वसीम शेख याला एक बलात्कार प्रकरणात मदत केल्याचा गुन्हाही बादशहा शेख याच्यासह सहा जणांविरुद्ध ८ डिसेंबर २०२२ रोजी दाखल आहे.
दौंड पोलिस ठाण्यासमोर बादशहा शेख याने २७ जून २०२५ रोजी जाहीररित्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच, जत (जि. सांगली) मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्या प्रकरणी २८ जून २०२५ रोजी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.