रूपाली चाकणकर-चित्रा वाघ
रूपाली चाकणकर-चित्रा वाघ सरकारनामा
पुणे

चाकणकरांनी चांगलं काम करावं; सत्तेतल्या रावणांना पाठीशी घालू नये

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महिला आयोगाचे अध्यक्षपद घटनात्मक दृष्टीकोनातून महत्वाचे पद आहे. त्या आल्यात, त्यांना काम समजावून घेऊन द्या, चांगल्या पद्धतीने काम करू द्या, असे सकारात्मक बोलत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, मुली-बाळींना त्रास देणाऱ्या सत्तेतल्या रावणांना त्यांनी पाठीशी घालू नये. तसे काही झाले तर आम्ही आहोतच असा इशाराही वाघ यांनी दिला.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना वाघ यांनी राज्यातील महिलांच्या संदर्भाने कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. रूपाली चाकणकर यांचे नाव न घेता महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने त्यांनी न्यायाने काम करावे, संजय राठोडसारख्या रावणांना त्यांनी पाठीशी घालण्याचे काम करू नये. तसे काही झाले तर जाब विचारायला आम्ही आहोतच, असा स्पष्ट इशारा वाघ यांनी दिला.

वाघ म्हणाल्या, ‘‘ सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले आहे.बीड,साकीनाका, परभणी,डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही.महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे.आता महिलांनी स्व-सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला.’’

माता-भगिनींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही, असा घणाघात वाघ यांनी केला.पत्रकार परिषदेत वाघ यांनी महिला सुरक्षाप्रश्नी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या, ‘‘ या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ महिलांची घोर निराशा आणि फसवणूक केली.ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले ,त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणा-या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत.महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याच्या घोषणा केल्या तो कायदा अजूनही लागू झालेला नाही.’’

वाघ म्हणाल्या, ‘‘ महिला अत्याचार प्रश्नी चहुबाजूंनी रान उठल्यानंतर जवळपास दीड वर्षांनंतर अखेर सरकारला महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा ऑक्टो २०२१ हा मुहूर्त सापडला.आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली तरी सदस्यांची नेमणूक केलेली नाही.त्यामुळे आयोगाचे काम पूर्णपणे सुरू होण्यास अडचणी आहेत. त्यामुळे सहा सदस्यांची नेमणूकदेखील लवकर झाली पाहिजे.वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन असो अथवा भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो प्रत्येक वेळी भाजपाने ' धक्का’ दिला की या सरकारची गाडी हलणार अशी स्थिती राज्यात आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT