Pune News, 03 Sep : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुण्यातील युट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. कोथरूड पोलिसांच्या पथकाने सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पंडित राहत असलेल्या ठिकाणी धडक देत त्यांना ताब्यात घेतले.
कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ संतोष पंडित यांनी आपल्या यूट्यूब अकाउंटवर प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह तसेच अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकाराची दखल घेत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बुधवारी रात्री उशिरा पंडित याच्या ठिकाणाचा शोध घेतला. पहाटे सुमारे १.०० वाजता कोथरूड पोलिसांचे पथक त्याच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्याला अटक केली.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी सारिका कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील तसेच मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर व व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ३ सप्टेंबरला गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याआधीही दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर अवमानकारक मजकूर आणि अश्लील भाषेतील व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. भाजप नगरसेवक सुनील पांडे यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडीओ प्रसारित झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
एकाच व्यक्तीविरोधात चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित सोशल मीडिया प्रकरणात पुन्हा तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा दिला जात असतानाच संतोष पंडित यांच्या अटकेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.