पुणे

ज्या सरकारने मला नजरकैद केलं ते सरकार उलथवणार : चंद्रशेखर आझाद

सरकारनामा ब्युरो

कोरेगाव भीमा : "विजय स्तंभाची भूमी ही संघर्षाची आणि शौर्याची भूमी असून याचा इतिहास कायम प्रेरणादायी आहे. मराठा, दलित, ओबीसी आणि मुस्लिम यांना एकत्र करुन ज्या सरकारने मला नजरकैदेत ठेवले ते सरकार उलथवून लावणारच", असे वक्तव्य भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केले. 

विजय स्तंभाला भेट दिल्यानंतर आझाद यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधला.

 आझाद यांच्या सभांना न्यायालयाने जरी बंदी घातली असली तरी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आझाद यांचा विजय स्तंभाला भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आझाद यांच्या स्वागतासाठी युवक भीमसैनिक मोठ्या प्रमाणात एकत्र जमले होते. आझाद यांची गाडी विजय स्तंभाजवळ पोहोचताच तरुणांनी गाडीला अक्षरशः गराडा घातला. प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी, अशा आशयाच्या घोषणा यावेळी तरुणांकडून दिल्या गेल्या.

सरकारनामाशी संवाद साधत आझाद पुढे म्हणाले, "मी ज्या बहुजन समाजाची लढाई लढत आहे, त्याची वाट खडतरच आहे. मात्र माझ्यासारख्या क्रांतिकारकासाठी हे अवघड नाही. कारण मीही १६ महिने तुरुंगात राहून आलोय. मी इथे पोहोचलो ते पोलीस आणि सरकारमुळे नाही तर संविधानामुळे आलोय. त्याच संविधानासाठी आयुष्यभर लढत राहणार आहे".

"गेल्या वेळी जे झाले, ते जाणीवपूर्वक घडवले गेले. मराठा  आणि दलित समाजात संघर्षाचा प्रयत्न केला गेला. पण मराठा-दलित एकत्र आहेत. मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम यांच्यात एकोप्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे", असेही आझाद म्हणाले.

पोलीस संभाजी भीडे आणि मिलिंद एकबोटे यांना मदत करत असून अशा लोकांवर बंदीच असायला हवी, असेही आझाद म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT