Pune News : पुण्यातील भिडेवाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. स्मारकाचे काम सुरू झाले असले तरी ते निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. सुनेत्रा पवार जोपर्यंत याबाबत भूमिका घेणार नाहीत, तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. विलीनीकरणाबाबत जेव्हा चर्चा होईल, तेव्हा आपण आपली भूमिका मांडू. पार्थ पवार पुण्यात असतात, त्यामुळे विलीनीकरणाबाबत त्यांनाच विचारावे, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, ठाकरे घराणे एकत्र आले तर मला आनंदच होईल. त्याचप्रमाणे पवार घराणेही एकत्र आले तर आनंद होईल. मात्र, हे प्रत्यक्षात होणार का, हे पाहावे लागेल. ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याची प्रक्रिया हळूहळू मार्गी लागत आहे. मात्र, पवार घराण्याच्या तुलनेत ठाकरे कुटुंबाचे एकत्र येणे सोपे होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत होते. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे दोघांच्या एकत्र येण्याचा मार्ग तुलनेने सोपा होता, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची परिस्थिती वेगळी आहे. एक गट इंडिया आघाडीसोबत आहे, तर दुसरा गट एनडीएसोबत आहे. या राजकीय परिस्थितीचा परिणाम दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणावर होत आहे. त्यामुळे विलीनीकरणासंदर्भातील सर्व प्रश्न हळुवारपणे सोडवावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच ठाकरे कुटुंब हळूहळू एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पवार कुटुंबाचे एकत्र येणे तुलनेने अवघड असल्याचे सूचक विधान छगन भुजबळ यांनी केले.
भाजपाच्या ग्रीन सिग्नल शिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा सुरू नाहीत. अजितदादांच्या निधनानंतर कोणतीही चर्चा विलीनीकरणाविषयी झाली नाही तसेच या विषयी प्रस्ताव देखील त्यांच्याकडे आला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.