Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Shinde on Thackeray: घरात बसून काम करीत नाही, फिल्डवर असतो; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : 'शासन आपल्या दारी' या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत दाखले आणि कल्याणकारी योजनांतील लाभांच्या वाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (ता.१६) पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली.

मी घरात बसून काम करीत नाही, तर फिल्डवर असतो, असा टोला शिंदेंनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री असूनही मी रस्त्यावर फिरतो, मला कसलाही इगो नाही. कारण मी रस्त्यावरचा माणूस आहे. कार्यकर्त्याचा सीएम झालो आहे, असे ते म्हणाले. आमचं सरकार खोटं काम करीत नाही. घरात बसून काम करीत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

हे जनतेचं सरकार असल्याने त्यांच्यासाठी एसटीत महिलांना अर्ध्या भाडे सवलतीसाऱखे ऐतिहासिक धाडसी जनहिताचे निर्णय़ घेतले. वैयक्तिक लाभाचे नाही, असे मी छातीठोकपणे सांगू शकतो, असे ते म्हणाले. आमचं सरकार येण्यापूर्वी सारे काही ठप्प होतं. आम्ही ते उघडं केलं. त्यामुळे कोविड पळून गेला, असा दावा त्यांनी केला. सरकारच्या निर्णय़ांची यादी त्यांनी यावेळी वाचून दाखवली.

शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत 'शासन आपल्या दारी' अभियान सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यात १ एप्रिलपासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात २ लाख ८६ हजार २७८ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले. १०४ शिबिराच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. चार महिन्यांपूर्वी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी त्यांनी हा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले होते.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT