Chinchwad By-Election : Ajit pawar
Chinchwad By-Election : Ajit pawar Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : लोकसभेसोबतच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागतील : अजितदादांचा अंदाज!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरीः विरोधीपक्षनेते अजित पवारांवर (Ajit Pawar) राष्ट्रवादीत अन्याय झाला असल्याची वात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुण्यात आपल्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता करताना आज पेटवली होती. बावनकुळेंचा समाचार चिंचवडच्या आपल्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता करताना अजितदादांनी घेतला.

अजित पवार म्हणाले, "बावनकुळे ऊर्जामंत्री असूनही त्यांना विधानसभेची उमेदवारी भाजपने दिली नाही. त्यांच्या पत्नीलाही तिकिट नाकारले. त्यातून त्यांच्यावरच भाजपमध्ये मोठा अन्याय झाला. त्या भावनेतून माझ्यावर माझ्या पक्षाने अन्याय केल्याचे वक्तव्य त्यांनी केले असावे," असे पलटवार करत अजित पवारांनी चिमटा काढला. तसेच माझ्यावर काहीच व कोणीच अन्याय केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आघाडीचे चिंचवडमधील उमेदवार नाना काटेंचा प्रचार संपल्यानंतर त्यांचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईरांच्या चिंचवड निवासस्थानी पत्रकापरिषदेत ते बोलत होते. यावेळी भोईर यांच्यासह काटे, माजी आमदार विलास लांडे, शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि चिंचवडचे पक्षाचे निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके आदी उपस्थित होते. लोकसभेबरोबरच विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक मे मध्ये होईल, असा अंदाज ही यावेळी अजित पवारांनी वर्तवला.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी `मोका`तील सराईत गुन्हेगारांना सोडले जात असल्याच्या बातम्या पाहिल्याचे सांगत अशाच मोकातील एका गुन्हेगाराने चिंचवडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखावर परवा हल्ला केला, याकडे अजितदादांनी लक्ष वेधले.

निवडणुकीत या गुंडांना स्थानबद्ध केले जात असताना ते सोडले जात आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ही निवडणूक सोपी नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने ते सोईचे राजकारण करीत आहेत. त्याचे उदाहरण देताना त्यांनी ते शास्तीमाफीच्या भाजपच्या श्रेयबाजीचे दिले. यापूर्वी दोनदा मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी हा निर्णय का घेतला नव्हता, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT