Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं न भूतो न भविष्यती असं दणदणीत विजय मिळवत तब्बल 119 जागा जिंकल्या. यानंतर भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदांवर कुणाला संधी दिली जाणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.पण आता महापौरपद आणि उपमहापौरपदाच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार, भाजपकडून महापौर पदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या सोमवारी(ता.2) रात्री झालेल्या बैठकीमध्ये वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे व मानसी देशपांडे ही तीन नावे निश्चित करण्यात आली. त्यानंतर, मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी भाजपला अनेक वर्ष भाजपला साथ देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर देण्याच्या सूचना फडणवीस यांनी नेत्यांना दिल्या.
त्यानंतर भाजपच्या गोटात वेगानं सूत्रे फिरली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार परशुराम वाडेकर यांना संधी देण्यात आली. त्यानुसार दुपारी साडे बारा वाजता महापालिकेत गटनेते गणेश बिडकर यांच्या दालनात भाजपची बैठक झाली. या बैठकीत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मंजूषा नागपुरे यांची महापौरपदासाठी, तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदासाठी अधिकृत घोषणा केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पुण्यात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत नवनियुक्त महापौरांच्या नावांसदर्भात सविस्तर चर्चा केली.यात त्यांच्यासमोर वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे आणि मानसी देशपांडे यांच्या नावाची शिफारस करण्याचं निश्चित करण्यात आले होते. या तीनही नगरसेविका या चौथ्यांदा निवडून आल्या आहेत.
दरम्यान, महापौरपदाच्या स्पर्धेत वर्षा तापकीर यांचं नाव आधी आघाडीवर होतं. मात्र,मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नागपुरे यांची ही नगरसेवक म्हणून तिसरी टर्म असून त्यांच्या रुपाने सिंहगड रोडला प्रथमच महापौरपद मिळत आहे. नागपुरे या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.