विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election)महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदी कोण असावे, याविषयी तीनही घटक पक्षात इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत झाले असले तरी या पदावरुन घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. आघाडीची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होईल, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानाकडे सगळ्याचे लक्ष वेधलं आहे.
ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच केले आहे. चव्हाणांच्या विधानाचा धागा पकडून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या वक्तव्याला दुर्लक्ष करता येणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं असं कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काही नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरु आहेत.
'मुख्यमंत्रिपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असा संकेत आहे,' असे चव्हाण म्हणाले होते. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा समावेश आहे.
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असे विधान सुरवातीला केले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर संजय राऊतांनी आपल्या विधान मागे घेतल्याचे चित्र आहे. अशातच शरद पवार यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या विधानामुळे यात भर पडली आहे.
शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेर मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनानंतर त्यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर पवारांनी मराठा आरक्षणावर स्पष्ट मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा आणि मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पाऊले टाकली पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय होईल, हे सांगता येणार नाही. मराठा आरक्षणाबाबत माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना पर्याय सुचवला की, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.