Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अवतीभवती राज्याचे राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधक थेट लाडकी बहीण योजनेवर टीका करणे टाळत असतानाच या योजनेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सरकारला लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल, अशी आशा असल्याने या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
या निमित्ताने सरकारमधील पक्षांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गुलाबीकरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सातत्याने गुलाबी कपड्यांमध्ये दिसत आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि बदलापूर अत्याचाराच्या घटनेबाबत सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, "बदलापूर मध्ये घडलेली घटना ही सामान्यांना चिडणारी आहे त्यामुळे त्यामध्ये राजकारण करण्याचा कोणताही संबंधच येत नाही. सध्या राज्यातील सरकार फक्त एका योजनेभोवती फिरत आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये कोणताच विषय राहिलेला नाही असं समजून सरकार काम करत आहे". सध्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहे शाळेमध्ये जाणारी बालका देखील सुरक्षित राहिली नाही इतकं असुरक्षित वातावरण यापूर्वी कोणत्याही सरकारमध्ये पाहिलं नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र गुलाबी झालाय का? असा प्रश्न विचारला असता, जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "महाराष्ट्र गुलाबी झालेला नाही. मात्र हे सरकार गुलाबी झालं आहे", अशी खोचक टीका केली. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मात्र हे सरकार वेगळ्याच गोष्टींमध्ये व्यग्र आहे. सध्या सरकारकडून पाच-पाच कोटी रुपये खर्च करून एसटी बस पाठवून महिलांना गोळा करायचं, त्यांना फेटे घालायचे आणि स्वतःचा उदो उदो करून घ्यायचा प्रोग्रॅम सुरू आहे. मात्र त्या महिलांच्या सुरक्षितेबाबत सरकार गंभीर नाही.
लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठ्या प्रमाणात ऑफिस झालं असून हीच योजना आपल्यासाठी तारणहार आहे, असं सरकारला वाटू लागला आहे. त्यामुळे दुसरा सर्व योजना थांबल्या असून त्या योजनेचे पैसे कपात व्हायला लागले आहेत त्यामुळे अर्थ खात्याला कदाचित झोप लागत नसेल की, उद्याचा दिवस कसा काढायचा, अशी परिस्थिती सध्याच्या सरकारने निर्माण केली आहे. लाडकी बहीण योजना ला आमचा विरोध नसून या योजनेला अधिक प्रभावीपणे आणि सुंदरतेने राबवता येईल, असं आमचं मत असल्यास जयंत पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.