pcmc  Sarkarnama
पुणे

मोशी कचरा डेपोतील आगीची धग पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना?

आगींच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी कचरा डेपोला ६ एप्रिलला प्रचंड मोठी आग लागली. ती विझवताना अग्निशमन दलाने (Fire brigade) शर्थ केली. परिणामी मोठा अनर्थ टळला होता. त्यांनतर दहा दिवसांनी पुन्हा या कचरा डेपोला नुकतीच (ता.१६ एप्रिल) आग लागली. या आगीत या डेपोत झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी मुद्दामहून लावण्यात आल्याचा आरोप झाल्याने पालिका प्रशासक तथा पालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh patil) यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी या आगींच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे तिची धग तिला जबाबदार पालिका अधिकारी, कर्मचारी वा डेपोतील ठेकेदारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याव्दारे कचऱ्यातूनही कोट्यवधी रुपये खाण्याचा भ्रष्टाचार समोर येण्याचा संभव आहे.

दरम्यान, आपल्या कचरा डेपोतील आगींची चौकशी पालिका स्वतच करणार असल्याने त्याविषयी साशंकता व्यक्त केली गेली आहे. या चौकशीत पालिका ठेकेदार, अधिकारी वा कर्मचारी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध ही चौकशी समिती कारवाईची शिफारस करेल की नाही, याविषयी विरोधकांना शंका वाटते आहे. त्यामुळे ही चौकशी त्रयस्थ तज्ञ व्यक्ती वा यंत्रणेमार्फत करण्याची मागणी पुढे आली आहे.

मोशी कचरा डेपोच्या बायोमायनिंग साइटला १६ तारखेला लागलेल्या आगीमागे कटकारस्थान व बायोमायनिंगचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आऱोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे. या डेपोतील लॅण्डफिल साइटला ६ तारखेला लागलेल्या आगीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या डेपोतील कोट्यवधी रुपयांची कामे न करताच बिले घेणाऱ्या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना व त्यातून भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेत्यांना वाचविण्यासाठी ती लावण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे तिची चौकशी ही समिती नेमून करण्याची लेखी मागणी त्यांनी पालिका प्रशासकांकडे केली होती. अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल आयुक्तांनी घेत चौकशी समिती स्थापन करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि शहर अभियंता राजन पाटील यांचा या समितीत समावेश आहे. त्यांनी एक महिन्यात आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या आगी हेतूपुरस्पर लावण्यात आल्या आहेत का, म्हणजेच त्या मानवनिर्मित आहेत का, त्यामागील कारणे काय आहेत, कोणाच्या चुकीमुळे या आगी लागल्या आहेत, त्याला कोण अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत, याची ही समिती चौकशी करणार आहे. या आगी टाळता आल्या नसत्या का, भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाय करावे लागतील, हे सुद्धा ही समिती सांगणार आहे. तसेच या त्यात किती नुकसान झाले आहे हे ठरवून त्याची जबाबदारी सुद्धा ही समिती निश्चीत करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT