Pune Congress Sarkarnama
पुणे

Pune Congress : हमरीतुमरी, शिवीगाळ अन्...; पुणे काँग्रेसमध्ये तुफान राडा, नेमकं काय झालं?

Nana Patole : गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये काँग्रेसची झालेली पिछेहाट यंदा तरी थांबेल अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाकडून केली जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी राज्य पातळीवरील काँग्रेसची नेतेमंडळी झटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसचे युवक नेते आपापसांत भिडताना पाहायला मिळतात. पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या युवा नेत्यांत शनिवारी तुफान राडा झाला. यावेळी दोन गटाने एकमेकांना शिवीगाळ करत हमरीतुमरीचा प्रकार घडला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाही या कार्यकर्त्यांनी जुमानले नसल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे काही मित्रपक्षांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यातच काँग्रेस अंतर्गतही दुही असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यातच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातही काँग्रेसमध्येही काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. आता तर काँग्रेसमधील युवानेत्यांचे दोन गट भिडल्यान पक्षातील ज्येष्ठ मंडळीही हतबल झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. जुने जाणते कार्यकर्ते एकत्रित येऊन काँग्रेस संघटन काशी मजबूत करण्यात येईल, याकडे लक्ष देत आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये काँग्रेसची झालेली पिछेहाट यंदा तरी थांबेल अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाकडून केली जात आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गट वारंवार एकामेकांविरोधात ठाकलेले पाहायला मिळतात. याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

शहरात काँग्रेसमध्ये जुन्या आणि नव्या शहराध्यक्षांचे वेगवेगळे गट आपापल्या ध्येयधरणावरती काम करताना दिसत आहेत. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन गटांना एकत्र आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिनर डिप्लोमासीचा पर्याय शोधला होता. त्यातून स्थानिक नेत्यांमधील मतभेद मिटवून त्यांच्यात मनोमिलनाची जबाबदारी माजी आमदार उल्हास पवारांवर सोपवली होती. खुद्द प्रदेशाध्यक्षांनी लक्ष घालूनही गटबाजी काही संपत नसल्याने अखेर तो कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.

एकीकडे वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये गटबाजी फोफावत असताना आता या गटबाचीच ग्रहण काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतही पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतील आजी-माजी अध्यक्ष शनिवारी काँग्रेस भवन परिसरात भिडल्याचे पाहायला मिळाले. हा वाद सोडविण्यास गेलेल्या माजी आमदारांशी व पदाधिकाऱ्याशीही त्यांनी हुज्जत घातल्याची माहिती आहे.

नाना पटोलेंनाही सोडले नाही

काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र बैठकीसाठी आले होते. पटोलेंनी काही स्थानिक नेत्यांची भेटी घेतल्या होत्या. या नेत्यांच्या भेटीगाठीवरूनही काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले होते. जो नेता राजकीय पटलावर अॅक्टिव्ह नाही, अशा नेत्याची भेट का घेतली असा सवाल पुणे युवक काँग्रेसने करत थेट पटोलेंना घेराव घातला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT