Popat Shelar, Sunil Jadhav, Sanjay Deshmukh
Popat Shelar, Sunil Jadhav, Sanjay Deshmukh Sarkarnama
पुणे

Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेनेत पदावरून वाद पेटला; शहरप्रमुखांना अवघ्या सात महिन्यांत बदलले

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : 'शहर प्रमुख बदला', ही नाराज शिवसैनिकांची कायमची आळवणी आणि गटबाजीचा शाप लागलेल्या शिरूर (Shirur) शहर व तालुका शिवसेनेत (ShivSena ठाकरे गट) पदांच्या नवनियुक्त्यांवरून पुन्हा सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. सातच महिन्यांपूर्वी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या सुनील जाधव यांना तडकाफडकी बदलून त्यांच्या जागी संजय देशमुख या पूर्वीच्याच शहर प्रमुखाची नियुक्ती केल्याने बहुतांश शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी व विशेषतः जाधव समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जाधव यांच्या नियुक्तीचा फेरविचार न झाल्यास सामूहीक राजीनामे देण्याचा इशाराही आज येथे काही पदाधिकाऱ्यांनी दिला. (Controversy rises in Shirur Shiv Sena : City chief removed from Sunil Jadhav in just seven months)

पूर्वी युवासेनेचे शहर अधिकारी असलेल्या सुनील जाधव यांची दहा ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. येथील पूर्वमुखी हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष व श्रीराम सेनेचे शहर प्रमुख असलेल्या जाधव यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असल्याने त्यांच्या शहर प्रमुख नियुक्तीचे जल्लोषात स्वागत झाले.

तरूण शिवसैनिकांच्या बळावर त्यांनी अनेक भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून धुरळा उडवला. धनुष्यबाण व शिवसेना पक्षनाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा, संजय राऊत यांच्याविरोधात अमित शहा यांनी केलेल्या अनुदार उद॒गाराचा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबाबत केलेल्या विधानांचा आणि उद्योग परराज्यात गेल्याचा निषेधही त्यांनी तेवढ्याच धाडसाने प्रभावी आंदोलनातून केला.

शिवजयंती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीचे सोहळेही त्यांनी तेवढ्याच दणक्यात साजरे केले. सुनील जाधव यांची शहर प्रमुख कारकिर्द ऐन फॉर्मात येत असताना आणि त्यांच्या कार्याची एक्स्प्रेस भन्नाट वेग पकडत असतानाच त्यांच्या शहर प्रमुख पदावर गंडांतर आले. संघटनात्मक बांधणीत कमी पडल्याचे कारण त्यासाठी लावले जात असल्याचे समजते.

तिथीनुसार शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी चालू असतानाच त्यांचे पद नगरसेवक संजय देशमुख यांना देण्यात आले. देशमुख हे सध्या जिल्हा संघटकपदावर कार्यरत होते व यापूर्वी त्यांनी शहर प्रमुखपद तब्बल १४ वर्ष भूषविले होते. या वेगवान घडामोडीचे तीव्र पडसाद शिवसैनिकांमध्ये उमटले आहेत. शिवजयंती मिरवणुकीत सुनिल जाधव यांना खांद्यावर घेत शिवसैनिकांनी जल्लोष केला, तर 'शिवसेनेच्या खऱ्या वाघाची काही लाडग्यांनी मिळून शिकार केली आहे. पण त्यांचा डाव यशस्वी होणार नाही’, असा आरोप शिरूर-आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी केला. या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास सामुहीक राजीनाम्याचा इशाराही त्यांनी दिला.

तालुका प्रमुख गणेश जामदार, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, युवा नेते अविनाश घोगरे, संतोष काळे, स्वप्निल रेड्डी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी या परिस्थितीला शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके व सुरेश भोर यांच्यापर्यंत शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिया पोचविल्या आहेत. ते सामान्य शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवतील व आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपजिल्हाप्रमुख कैलास भोसले यांनीही जे झाले ते योग्य झाले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

पक्षांतर्गत बाब संवाद साधून मार्ग काढू : शेलार

दरम्यान, या सर्व प्रकरणावर तालुकाप्रमुख पोपट शेलार यांनी चुप्पी साधली आहे. मी पक्षाचा निष्ठावान सैनिक असून, पक्षादेशाप्रमाणे काम करतो. पक्षनिर्णय शिरसावंद्य मानून काम करताना सर्वांची मोट बांधून यापुढेही काम करण्याचा प्रयत्न करू. पक्षांतर्गत बाब असल्याने आम्ही आमच्या पातळीवर परस्पर संवाद साधून मार्ग काढू. या विषयावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. पक्षाने जी जबाबदारी सोपविली, ती इमानेइतबारे पार पाडताना, या अडचणीच्या काळात पक्षसंघटन मजबूत करणार असल्याचे नूतन शहर प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले.

मी पक्षाकडे स्वतःहून पद मागायला गेलो नव्हतो : जाधव

मी कधीही पक्षाकडे स्वतःहून पद मागायला गेलो नव्हतो. परंतू, पक्षाने माझे काम, तरूणांचे संघटन, सामाजिक उपक्रम बघूनच मला शहर प्रमुखपद दिले होते. पण, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात माझे काम सलत होते. कारण त्यांना हे काहीच करता येत नव्हते. त्यांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचून बदनामी केली, अशी खंत सुनील जाधव यांनी व्यक्त केली. पद काल होते, आज गेले. पण शिवसैनिक म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहूनच काम करण्याचा आणि नावाला पदे मिरविणारांना उघडे पाडण्याचा निर्धार जाधव यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT