Online fraud Sarkarnama
पुणे

पिंपरीच्या नगरसेवकाची ऑनलाईन फसवणूक; चौकशीनंतर प्रकार उघडकीस...

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सध्या खूप वाढले आहेत. आयटीनगरी असलेले पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad City) शहरही त्याला अपवाद नाही. या व्हाइट कॉलर गुन्हेगारांनी आपला हिसका नुकताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अंबरनाथ कांबळे यांनाच दाखवला आहे. गरजू असल्याचे आपल्या लाघवी बोलण्यातून पटवून देत एकाने कांबळेंना गंडा घातला. आपल्या मुलीला अपघात झाल्याचे सांगून त्याने कांबळे यांच्याकडून साडेसहा हजार रुपये उकळले. दुसऱ्यांदा दहा रुपये काढण्याचा त्याचा डाव, मात्र सतर्क झालेल्या नगरसेवकामुळे फसला गेला.

मोबाईल फोनवरून लाघवी बोलण्यातून गूगल पे व्दारे पैसे उकळणारी ही टोळी असून तिने अनेकांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कांबळे यांना गंडा घालणारा नाशिकचा आहे. त्याच्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या ठकसेनाच्या शोधासाठी एक पथक नाशिकला रवाना झाले आहे. १९ तारखेला गूगल पे व्दारे ही फसवणूक झाली. त्याबाबत २३ तारखेला तक्रार येताच लगेच गुन्हा दाखल करून सांगवी पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे.

फिर्यादी नगरसेवक कांबळेंना तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरहून फोन आले. त्यातील एकाने अपघातग्रस्त मुलीचा बाप, दुसऱ्याने आई, तर तिसऱ्याने डॉक्टर असल्याचे सांगत मदतीची याचना केली. त्यामुळे दया येऊन कांबळेंनी साडेसहा हजार रुपये गूगल पे व्दारे दिले. मात्र, पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी करताच ते सावध झाले. त्यांना किंचीत शंका आली. म्हणून त्यांनी चौकशी केली असता या ठकसेन टोळीची फसवणूक उजेडात आली.

१९ तारखेला कांबळेंच्या मोबाईलवर एक फोन आला. मी बावीस्कर बोलतोय. माझी मुलगी भाग्यश्रीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या उपचारासाठी तातडीने पैशाची गरज असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. त्यावेळी कांबळे हे एका कार्यक्रमात होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला मदत करण्यास सांगितले. गूगल पे व्दारे पैसे पाठवा, असे म्हणाला. म्हणून सौ. कांबळे यांनी पैसे दिले. त्यानंतर फिर्यादींना पुन्हा बावीस्कर नाव सांगणाऱ्याने फोन केला. यावेळी त्याने दहा हजार रुपये देण्याची विनंती केली. यावर ते थेट वायसीएम रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांना अशा नावाची कोणी मुलगी दाखल नसल्याचे समजले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

कांबळे म्हणाले, माझ्या जवळच्या एक नाही, तर तीन कार्यकर्त्यांची फसकवणूक करणाऱ्याने नावे सांगितली. मला अण्णा म्हणतात, हे सुद्धा त्याला माहित होते. म्हणून अण्णा मला मदत करा, या त्याच्या लाघवी बोलण्याला फसलो, असे नगरसेवक कांबळे यांनी सरकारनामाला सांगितले. मात्र, दुसऱ्यांदा फोन आला, तेव्हा मी वायसीएममध्ये गेलो. तेथील औषध दुकानदाराला सबंधित मुलीसाठी तिच्या वडिलांना का औषधे दिली नाही हे विचारले. त्यावर तुमचे नाव घेऊन कोणी आलेच नसल्याचे दुकानदार म्हणाले. तेथेच संशय आल्याने अधिक चौकशी थेट डीनकडे केली अन हा प्रकार समोर आल्याचे असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT