Shivajirao Adhalrao Patil and Amol Kolhe  Sarkarnama
पुणे

Adhalrao Patil On Amol Kolhe: खासदार झालो म्हणजे मोठा झालो, चाललो शुटिंगला; आढळराव-पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

Shivajirao Adhalrao Patil and Amol Kolhe New : शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटलांचे खासदार कोल्हेंवर पुन्हा शरसंधान, पुणे-नाशिक रेल्वेवरून घेतले फैलावर

उत्तम कुटे

पिंपरी : शिरुरचे माजी खासदार तथा शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रूत आहे. त्यात आढळरावांनी शनिवारी नाव न घेता कोल्हेंना पुन्हा फैलावर घेतले. त्यातून या दोघांत नव्याने `तू-तू,मैं-मै` होण्याचे संकेत मिळाले आहेत.

खासदार नसले, तरी `डीपीडीसी`चे सदस्य असल्याने तेथून आढळऱाव हे `शिरुर`साठी निधी आणत आहेत. त्यातून आणलेल्या निधीतून खेडच्या पूर्व भागातील कामांचे भूमिपूजन त्यांनी आपल्या गावभेट दौऱ्यानिमित्त शनिवारी केले.

यावेळी त्यांनी आपले कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी कोल्हेंना पुन्हा फैलावर घेतले. खासदार झालो म्हणजे मी मोठा झालो, चाललो शुटिंगला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता कोल्हेंना जोरदार टोला लगावला. त्यांच्या या वाक्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली.

माझ्या दृष्टीने तुम्ही खासदार, आमदार नाही, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येता ते तुम्हाला मोठे होण्यासाठी नाही, असे आढळराव म्हणाले. मी खासदार झालो, म्हणजे माझं जनतेशी नातं संपलं, मी चाललो शुटींगला, तुमचं तुम्ही बघा, असं नसतं, असा जोरदार टोला त्यांनी खासदार कोल्हेंना लगावला. त्यासाठी सातत्याने जनतेत जावं लागतं. त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं लागतं, असा सल्ला त्यांनी दिला.

कामे करेल या मोठ्या अपेक्षेने जनता ही आढळराव, दिलीप मोहिते-पाटील (खेडचे आमदार), सुरेश गोरे (खेडचे माजी आमदार) व कुणालाही निवडून देत असते, असे ते म्हणाले. गेली काही वर्षे नुसतीच चर्चा होत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावरूनही आढळरावांनी कोल्हेंना लक्ष्य केलं. एका सहीमुळे हा प्रकल्प अडला आहे, असे सांगणाऱ्या कोल्हेंवर त्यांनी हल्लाबोल केला.

असा रेल्वे प्रकल्प हा दोन दिवसांत, पाच वर्षात होणारा नसतो, त्यासाठी १५ वर्षाची मेहनत घ्यावी लागते, असे म्हणत त्यांनी या रेल्वेमार्गासाठी आपण १५ वर्षे कसा पाठपुरावा केला, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कोकण रेल्वेचे उदाहरण दिले.

मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिसांसारखे महाराष्ट्रातील दोन रेल्वेमंत्री आणि मधु लिमये अशा तीन दिग्गजांचा पाठपुरावा असूनही कोकण रेल्वे पूर्ण होण्यासाठी २७ वर्षे लागली. दुसरीकडे आमचे हे बाबा (खासदार कोल्हे) म्हणतात पुणे-नाशिक-रेल्वे दोन वर्षात पूर्ण करणार, पण ते शक्य नाही, असे आढळराव म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT