Daund Sugar Factory
Daund Sugar Factory Sarkarnama
पुणे

‘सरकारी पाहुणे’ शोध मोहिमेत व्यस्त अन्‌ अजितदादांच्या कारखान्याचा गाळप हंगाम दणक्यात सुरू

प्रफुल्ल भंडारी

दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्यांना ‘पाहुणे’ म्हणून संबोधले, त्या प्राप्तीकर विभागाचे अधिकारी सलग चौथ्या दिवशी शोध मोहिमेत व्यस्त असताना दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याचा तेरावा गळित हंगामाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. अजित पवार या कारखान्याचे मार्गदर्शक आहेत. (Crushing season of Daund Sugar Factory's Start Today )

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात ७ ऑक्टोबरच्या सकाळपासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची शोध मोहिम सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कागदपत्रांची व डिजिटल डाटाची पाहणी आणि पडताळणी सुरू आहे. कारखाना व परिसरात येणाऱ्यांची चौकशी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. प्राप्तीकर विभागाचा छापा पडला किंवा शोध मोहिम सुरू झाली तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. परंतु आज कारखान्याच्या गळित हंगामाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांचे धाकटे बंधू तथा दौंड नगरपालिकेचे नगरसेवक इंद्रजित जगदाळे व त्यांच्या पत्नी उमादेवी इंद्रजित जगदाळे यांच्या हस्ते बॅायलर प्रदीपन करण्यात आले. त्याचबरोबर पूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळित हंगामाचादेखील शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यास वीरधवल जगदाळे यांच्यासह पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, दौंड बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे, दौंड नगरपालिकेचे आजी-माजी सदस्य व ऊस उत्पादक उपस्थित होते.

अजित पवार यांचे नातेवाईक तथा देवळाली प्रवरा (जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पण, काही कारणास्तव ते गळित हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. दुसरीकडे, प्राप्तीकर विभाग नेमक्या कोणत्या कारणास्तव कारखान्यात शोध मोहिम राबवित आहे , याचा उलगडा चौथ्या दिवशी देखील झालेला नाही.

पाहुणे केव्हा जाणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित राज्यातील साखर कारखाने, कार्यालये आणि बहिणींच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून शोध मोहिम सुरू केली आहे. त्यावर अजित पवार यांनी `पाहुणे (प्राप्तीकर विभागाचे अधिकारी) त्यांचं काम करून गेल्यानंतर मी बोलणार`, अशी प्रतिक्रिया दिली होती. चार दिवसांनंतरही शोध मोहिम सुरू असल्याने हे ‘पाहुणे’ केव्हा जाणार आणि पवार त्यावर काय भाष्य करणार?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT