Dada Kondke  Sarkarnama
पुणे

Dada Kondke Memorial : दादा कोंडकेंच्या मुळगावी होणार स्मारकाची उभारणी; दोन आमदारांनी घेतला पुढाकार...

Dada Kondke Legacy : आजकाल पुढार्‍यांच्या वडिलांची कोट्यवधी रुपये खर्च करून मोठी मोठी स्मारके तयार केली जातात, मात्र तिकडे कोणी फिरकतही नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : मराठी चित्रपटसृष्टीचे 'विनोदाचा बादशाह' दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे त्यांच्या जन्मगावी, म्हणजेच भोर तालुक्यातील इंगवली येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारले जात असून, यासाठी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विशेष राजकीय पुढाकार घेतला आहे.

स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी आपल्या आमदार निधीतून तातडीने ५० लाख रुपयांचा निधी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. शनिवारी इंगवली येथील हनुमान मंदिरात आमदार पडळकर, सदाभाऊ खोत, भोरचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक सकारात्मक बैठक पार पडली.

बैठकीत दादा कोंडके यांचे स्मारक उभारण्यावर सर्वांचे एकमत झाले. बैठकीत ग्रामस्थांनी सुचवलेल्या ग्रामपंचायतीच्या जागेची शासकीय अधिकाऱ्यांसह दोन्ही आमदारांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, आजकाल पुढार्‍यांच्या वडिलांची कोट्यवधी रुपये खर्च करून मोठी मोठी स्मारके तयार केली जातात, मात्र तिकडे कोणी फिरकतही नाही. दुसरीकडे चित्रपट क्षेत्रातील एवढ्या मोठ्या महान कलावंताचे स्मारक अद्याप तयार झालेले नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे."

​"आम्ही या कामासाठी खंबीरपणे पुढाकार घेतला असून, ८ ऑगस्ट रोजी दादा कोंडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मारकासाठी पहिली कुदळ मारली जाईल. इंगवली गावात एक भव्य-दिव्य स्मारक निर्माण करून, त्याच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करू," असा संकल्पही पडळकर यांनी बोलून दाखवला.

भोर तालुक्याच्या पर्यटन विकासाला मिळणार बळ

आमदार सदाभाऊ खोत यांनी या स्मारकाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, दादा कोंडके हे केवळ एका गावचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव आहेत. सलग ९ चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी यशाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद असणाऱ्या या महान अभिनेत्याचे स्मारक इंगवली गावाच्या आणि भोर परिसराच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणारे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT