इंदापूर : इंदापूर तालुक्यात परतीचा चांगला पाऊस पडल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढत असताना राजकीय हवा मात्र गरम होत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता आल्यानंतर दत्तात्रय भरणे याना मंत्रिपद मिळणार, की भाजपाप्रणित सरकार झाल्यास 19 वर्ष विविध खात्यांचे मंत्रीपद भूषवलेल्या हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपद मिळणार? याची राजकीय चर्चा तालुक्यात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राजकीय हलचालीस प्रारंभ झाल्याने इंदापुरचे राजकारण गतिमान बनत चालले आहे.
इंदापूर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार भरणे हे काठावर पास तर पाटील काठावर नापास झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा भरणे यांना यंदा 12 हजार मते कमी पडली तर हर्षवर्धन पाटील यांना 17 हजार मते वाढली आहेत. त्यामुळे दोघांनी तालुक्याच्या विकासासाठी काम करावे असा जनादेश आहे. नोटा किंवा अपेक्षांना मिळालेली मते पाहता भरणे भाग्यवान ठरले आहेत तसेच राज्यातील धनगर समाजातून निवडून आलेले ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेनेचे सरकार झाल्यास भरणे यांना निश्चित मंत्री होण्याची संधी आहे. मात्र तसे झाल्यास भरणे यांना पाटबंधारे खात्याचे मंत्रीपद मिळावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
हे देखिल वाचा - मोदींनी राष्ट्रवादीचे कौतुक केल्याने भाजप पुन्हा येणार?
तर हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीमंडळात 19 वर्ष काम केले असून त्यांनी सहकार व संसदीय कार्य, पणन, महिला व बालकल्याण मंत्री, कृषी व जलसंधारण राज्यमंत्रीपद भूषवले आहे. राज्यातील संयमी, अभ्यासू व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असणारा नेता म्हणून त्यांनाओळखले जाते. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू रोखण्या साठी भाजपाला हर्षवर्धन पाटील यांची गरज आहे.
तुम्ही मला हर्षवर्धन पाटील द्या, मी तुम्हाला विकास देतो असे म्हणण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विजयी करा, मी त्यांना मंत्री करतो असे म्हटले असते तर पाटील यांचा विजय निश्चित होता असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाटील यांचे योग्य राजकीयपुनर्वसन करण्यासाठी तसेच शेतकरी, सहकार चळवळयांना अच्छे दिन आणण्यासाठी त्यांना पणन व सहकार खात्याचे मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान करावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी आहे.
त्यामुळे सत्तेच्या 20 - 20 मध्ये भाजपा आघाडी घेणार की राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष भाजपास शिवसेनेच्या सहकार्याने धोबीपछाड देणार यावर भरणे व पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सत्तेसाठी आग्रही असून मंत्रिपदाची लॉटरी कुणास लागणार याकडे राजकीय धुरिणाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.