Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, "बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्यासाठी…"

Mangesh Mahale

Pune : राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पहिल्याच भाषणात अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली होती. पुण्यात सध्या 'भावी मुख्यमंत्री'असा उल्लेख असलेले अजितदादांचे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करताना अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री, पालकमंत्री व्हावे, असा केला आहे. त्यावर अजितदादांनी भाष्य केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, "बॅनरबाजी करून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही, कोणाला मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायचं असेल, तर त्यासाठी 145 या मॅजिक फिगरचा आकडा गाठायला लागतो. जो हा आकडा गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो आकडा गाठला होता, आता एकनाथ शिंदे यांनी गाठला होता,"

अजितदादांची आज कोल्हापुरात सभा आहे. कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी पुण्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. "काही दिवसांपूर्वी मुंबईतही राष्ट्रवादी भवनच्या बाहेर जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि माझे बॅनर लावण्यात आले होते. पण अशा प्रकारची बॅनरबाजी करायला आम्ही सांगत नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. कोल्हापूरकडे जाण्याआधी त्यांनी पुण्यात रोड शो केला. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर ते कोल्हापूर-सातार मार्गाने कऱ्हाडकडे रवाना झाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत अजितदादा म्हणाले, "राज्य सरकारकडून अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. या विषयावर विरोधी पक्षाची बाजू जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे. ओबीसी, कुणबी समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे,"

तपोवन मैदानात आज अजित पवारांची सभा होत आहे. सभेसाठी जिल्ह्यातील नेत्यांसह मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर शहरातील कावळा नाक्यावर त्यांचे आगमन होईल. तेथून मिरवणुकीने तपोवन मैदानात ते यणार आहेत. मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT