Sachin Korde Patil, Mahendra Pathare Latest News
Sachin Korde Patil, Mahendra Pathare Latest News Sarkarnama
पुणे

दोन टर्म नगरसेवक राहिलेल्या पठारेंवर पराभवाची नामुष्की; नवख्या तरूणाने धूळ चारली...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून एकत्र आलेल्या कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेत (PMC) दोनवेळा नगरसेवक असलेल्या तसेच मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या राष्ट्रवादीच्या महेंद्र पठारे यांचा तब्बल सात हजार ९०० मतांनी पराभव झाला आहे. त्यांचा हा पराभव सचिन गोर्डे पाटील या विद्यापीच्या राजकारणात नवख्या असलेल्या तरूणाने केला आहे. हे विशेष. (Sachin Korde Patil, Mahendra Pathare Latest News)

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने दहापैकी नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला धूळ चारली. आघाडीचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकला. पुरेशा तयारीअभावी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीला अपयश आले. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून कॉग्रेस, राष्ट्रवादी, (NCP) शिवसेना हे तीन पक्ष मैदानात उतरले. भाजपा तसेच राष्ट्रीय सवयंसेवक संघाशी संबंधित शिक्षण संस्थाच्या विद्यापीठ विकास मंचने सुरूवातीपासूनच जय्यत तयारी केल्याने त्यांना यश मिळविता आले.

दोन टर्म नगरसेवक राहिलेल्या पठारे यांची मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे काका बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार आहेत. पुणे पालिकेच्या राजकारणात पठारेंचा मोठ दबदबा आहे. मात्र, विद्यापीठाच्या राजकारणात ते कच्चे लिंबू ठरले. याउलट विद्यापीठाच्या राजकारणात तरबेज असलेल्या विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली. नियोजनबद्धपणे केलेल्या कामाचे फळ त्यांना मिळाले. वैचारिक जवळीक नसलेल्या अनेक संस्थांनीदेखील विद्यापीठाच्या राजकारणात विद्यापीठ विकास मंचला मदत केली.

या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजय मिळविलेल्या प्रसेनजीत फडणवीस यांच्यासाठी यावेळी पुरेशी काळजी घेण्यात आली. प्रसेनजीत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधु आहेत. गेल्यावेळी झालेल्या अधिसभा निवडणुकीत फडणवीस यांना दगाफटका झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे बंधु असूनदेखील त्यांना काठावर पास झाल्यासारखे निवडून आले होते. परिणामी यावेळी त्यांच्यासाठी विद्यापीठ विकास मंचने विशेष काळजी घेतली.

दरम्यान, या निकालासंदर्भात बोलताना महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "मुळामध्ये या निवडणुकीची आमच्याकडून फारशी तयारी झाली नव्हती. विद्यापीठ हे आपले संस्थान आहे, असं मानणाऱ्या काही लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही या निवडणुकीत ऐनवेळी उतरलो. अत्यंत कमी कालावधीत ही निवडणूक लढवून आम्ही एक जागा जिंकून आणली. या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून विद्यापीठाच्या राजकारणात अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT