Ajit Pawar-devendra Fadnavis-Sunil Shelke Sakarnama
पुणे

अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

अजित पवारांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा काही भाजप नेत्यांचा डाव आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर प्राप्तीकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने या कारवाईविरोधात जोरदार निदर्शने करीत केंद्र सरकार व मोदी, शहांचा निषेध केला, तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आज (ता. ९ आक्टोबर) भाजपवर हल्लाबोल केला. अजितदादा व त्यांच्या नातलगांच्या कारवाईमागील सूत्रधार हे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा गंभीर आरोप आमदार शेळके यांनी केला. (Devendra Fadnavis is real mastermind behind the raid on Ajit Pawar's factories!)

ज्यांची सत्ता गेली, त्या भाजप नेत्यांना आता वाटते की, पुन्हा आपली सत्ता येणार नाही. त्यातूनच ही षडयंत्रे रचण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. मात्र, भाजपच्या या दबावतंत्राला, सुडाच्या राजकारणाला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते घाबरणार नाहीत. भाजपला पुरून उरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेऊन पुरोगामी महाराष्ट्रात सुडाचे राजकारण चालणार नाही, हा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत जनतेने पोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवारांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा काही भाजप नेत्यांचा डाव असल्याचा दावाही आमदार शेळके यांनी केला. एक सक्षम नेतृत्व म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत असल्याने भाजप नेत्यांचा पोटशूळ उठत आहे. मंत्रालयात सकाळी सहापासून संध्याकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे प्रश्न ते सोडवितात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कामाच्या जोरावर त्यांनी राज्यातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इतर राजकारण्यांसारखे ते नागरिकांना ताटकळत ठेवत नाहीत. काम होणार असेल तर ते झटकन करतात. होणार नसेल तर तोंडावर होणार नाही, असे सांगतात. तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असून दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, त्यामुळेच भाजपचा पोटशूळ उठला आहे. त्यातूनच केंद्रीय संस्थाचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास दिला जात आहे, असा दावाही आमदार शेळके यांनी केला.

काही भाजप नेते जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. यामागील खरे सूत्रधार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासारखे नेते महाविकास आघाडी सरकारवर खोटेनाटे आरोप करून बदनामी करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहेत. पण, महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या भूलथापांना कदापी बळी पडणार नाही, असेही शेळके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT