Eknath Shinde Sarkarnama
पुणे

'स्वराज्यरक्षक' ऐवजी 'धर्मवीर' ; स्मारक आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी!

Sambhaji Maharaj Smarak : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ.अमोल कोल्हे या दोघांनाही शह दिल्याचे बोलले जात आहे.

भरत पचंगे,शिक्रापूर

शिक्रापूर : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच मंजूर विकासकामे रद्द करण्याच्या राजकीय घमासानामध्ये छत्रपती संभाजी महाराज जागतिक दर्जाच्या स्मारकाला स्थगिती हा वादाचा मुद्दा ठरला होता. शिंदे-फडणवीस सरकार मंजूर कामे रद्द करण्यावरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याबाबतीत झालेल्या सर्वात मोठ्या वादाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी थेट सुधारीत आराखड्याचे आदेश दिले. यात विशेष बाब म्हणजे या बैठकीत पूर्वीच्या आराखड्यात समाविष्ट असलेले स्वराज्यरक्षक या नावाऐवजी सुधारीत आराखड्याला धर्मवीर अशी उपाधी जोडली आहे. यामुळे एकाच वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ.अमोल कोल्हे या दोघांनाही शह दिल्याचे बोलले जात आहे.

आज झालेल्या बैठकीत संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक ऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा करून छत्रपती संभाजी महाराज जागतिक दर्जाच्या स्मारकाचा सुधारीत आराखडा तात्काळ बनवून, मंजुरीसह या कामाला लवकर प्रारंभ करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचप्रमाणे शिरुरमधील इतर महत्त्वाचे प्रश्नही मार्गी लावण्याच्या सूचना शिंदे यांनी दिले. यामुळे आजची बैठक शिरुर लोकसभा मतदार संघासाठी निर्णायक ठरली. बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथेच करण्याचे आदेश दिले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने शिवाजीराव आढळराव व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या निवेदनांनुसार यावर निर्णय झाला. प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव उपस्थिती होते. सर्वप्रथम वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक दर्जाच्या स्मारकाचा सुधारीत आराखडा तात्काळ अद्ययावत करा, स्थानिक कृती समितीच्या सुचनांचा विशेष सहभाग करा, स्मारकाला निधी कमी पडू देवू नये, ग्रामस्थांना आराखड्यात सहभाग व स्थान द्यावे, स्वराज्यरक्षक ऐवजी धर्मवीर असाच उल्लेख या पुढे व्हावा, अशा सूचना करुन या सुधारीत आराखड्याला तात्काळ सादर करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी सुधारीत विकास आराखड्यात गावाला आणि ग्रामस्थांना सहभागी करुन घ्यावे या विनंतीला होकार देणा-या मुख्यमंत्र्यांनी, वढु बुद्रुक ग्रामस्थांशी चौकशी करुन स्थानिक माहितीही घेतली. यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या २१ मार्च रोजी होणा-या धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण मुख्यंत्र्यांनी स्विकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT